दारुच्या दुकानांवर दर्दींची तुडुंब गर्दी! लॉकडाउनमुळे स्‍टॉक करण्यावर भर, पाहा VIDEO

नाशिक : कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे जाहीर केलेल्‍या लॉकडाउनमुळे नोकरी- व्‍यवसायाचे काय होईल, याची धास्‍ती अनेकांनी घेतली होती. असे असताना दुसरीकडे मात्र लॉकडाउनमुळे गैरसोय नको म्‍हणून मद्याचा साठा करण्यासाठी मद्यप्रेमींनी दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लावल्‍या होत्‍या. परिस्‍थिती कधीपर्यंत सुधारेल, हे निश्‍चित नसल्‍याने स्‍टॉक करण्यावर अनेकांचा भर राहिला. मद्य विक्री दुकानांबाहेर झालेल्‍या ‘दर्दींची गर्दी’ हा चर्चेचा विषय ठरला. 

 

गेल्‍या वर्षी लॉकडाउन जाहीर झाल्‍यानंतर दीर्घ काळासाठी अन्‍य दुकानांप्रमाणे मद्य विक्री दुकाने बंद होती. त्या मुळे मद्यप्रेमींना मद्य मिळविण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागला होता. प्रसंगी दुप्पटपासून तर चारपट किंमत मोजत अनेकांनी आपली तलफ पूर्ण केली होती. इतकेच नव्‍हे, तर लॉकडाउन शिथिल झाल्‍यानंतर मद्यांची दुकाने खुली होताच तुफान गर्दी करत मद्य खरेदी केली होती. हा पूर्वानुभव लक्षात घेता यंदा गैरसोय होऊ नये, याची खबरदारी घेताना सोमवारी (ता. ५) जोरदार खरेदीवर भर राहिला. शहर परिसरातील मद्य विक्री दुकानांबाहेर शिस्‍तीत रांगांमध्ये उभे राहून अनेकांनी मद्य खरेदी केली. एकीकडे व्‍यापारी व नोकरदारवर्ग विवंचनेत असताना, दुसरीकडे मद्य खरेदीसाठी सुरू असलेली धडपड शहर परिसरात चर्चेचा विषय ठरला. यापूर्वी जाहीर निर्बंधांनुसार दुकानांना सायंकाळी सातपर्यंत वेळेची मुदत असल्‍याने शेवटच्‍या मिनिटापर्यंत खरेदीचा ओघ सुरू राहिला, तर रांगेत उभे राहूनही काहींचा क्रमांक निर्धारित वेळेत न आल्‍याने त्‍यांना रिकाम्‍या हाती हताश होऊन परतावे लागल्‍याचे चित्र काही ठिकाणी बघायला मिळाले. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

प्रत्‍येकाकडून हजारोंची खरेदी 

दुकानात प्रवेश करण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहिल्‍यानंतर आत गेल्‍यावर प्रत्‍येक ग्राहकाकडून भलीमोठी मागणी नोंदविली जात होती. जोरदार खरेदी करत मोठ-मोठे बॉक्‍स घेऊनच ग्राहक बाहेर पडत होते. प्रत्‍येकाकडून किमान एक हजाराहून अधिकचीच खरेदी केली जात होती. 

तंबाखूजन्य पदार्थांच्‍या खरेदीत लक्षणीय वाढ 

मद्याप्रमाणे तंबाखूजन्‍य पदार्थांच्‍या खरेदीतही लक्षणीय वाढ झाल्‍याचे चित्र होते. शहर परिसरातील पानटपऱ्यांवर तंबाखूजन्‍य पदार्थांच्‍या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. लॉकडाउन काळात जादा पैसे मोजण्यापेक्षा आताच आगाऊ खरेदी करीत असल्‍याचे ग्राहकांचे म्‍हणणे होते. 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार