नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये ४ मार्चपासून ११ व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स परिसरातील युगात्मा शरद जोशी विद्यानगरीत होणाऱ्या दोन दिवसीय संमेलनात शेती व शेतकऱ्यांशीनिगडीत विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन केल्याची माहिती संयोजन समितीकडून देण्यात आली.
सीबीएस येथील हुतात्मा स्मारकामध्ये गुरुवारी (दि.१५) संमेलन संयोजन समितीने पत्रकार परिषद घेतली. संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी माहिती देताना दोन दिवसांच्या या संमेलनामध्ये ग्रंथ दिंडी, शेती व शेतकऱ्यांवरील परिसंवाद, शेतकरी कवी संमेलन, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांची प्रकट मुलाखत, शेतकरी गीत-संगीत रजनी, शेतकरी गझल मुशायरा असे निरनिराळ्या कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद भानू काळे हे भुषविणार आहेत. सरोज काशीकर, पुष्पराज गावंडे, ॲड. वामनराव चटप, रामचंद्रबापू पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे यांनी संमेलनामधून शेतकऱ्यांपुढील अडचणी, शेतीचे प्रश्न व त्यावरील मार्ग यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले. तसेच बदलत्या हवामानानूसार शेतकऱ्यांनी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत:ची व्यवस्था निर्माण करण्याबाबतही संमेलनात खल होणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेप्रसंगी आयोजन समितीच्या प्रा. मनीषा रिठे, प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश ऊगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कर्डक आदी उपस्थित होते.
८०० सदस्य लावणार हजेरी
नाशिकमध्ये होत असलेल्या शेतकरी साहित्य संमेलनामध्ये सुमारे ८०० सदस्य उपस्थिती लाभणार आहे. दोन दिवसीय या संमेलनातील विविध चर्चासत्रांमधून पुढे येणाऱ्या विषयांवर ठराव मांडले जातील. संमेलनामध्ये अंतिम झालेल्या ठराव हे राज्य शासनाकडे पाठविले जाणार आहे. तसेच संबंधित ठराव हे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे गंगाधर मुटे यांनी सांगितले.
The post दाेनदिवसीय संमेलनात विविध चर्चासत्रांचे आयोजन appeared first on पुढारी.