दिंडोरी तालुक्यात अवकाळीचा धुमाकूळ; द्राक्ष उत्पादकांचे धाबे दणाणले 

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्याच्या पुर्व व पश्‍चिम भागात अवकाळी पावसाने सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह अर्धा तास हजेरी लावली. यामुळे द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. 

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला. सायंकाळी पाचच्या सुमारात दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसामुळे द्राक्षासह कांदा, गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निर्यातक्षम द्राक्षांना सबसिडी बंद केल्याने शेतकऱ्यांकडून वीस रुपये कमी भावात व्यापारी व निर्यातदार शेतकऱ्यांकडून खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. आगामी द्राक्षांला पुढची अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून कागदात गुंडाळून ठेवले आहे. यातच विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने अर्धा तास हजेरी लावल्यामुळे द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा आदी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. द्राक्ष घडांना कागद लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. तो खर्च या पावसामुळे पाण्यात जाणार आहे. वादळी पावसाने गव्हाचे पिक आडवे पडले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.  

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार