दिंडोरी-पेठ रोड ब्लॅक स्पॉट कायमच; पंचवटीत स्वच्छता मोहिमेचा बोजवारा

म्हसरूळ (नाशिक) : महापालिकेने जाहीर केलेले कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट अद्यापही कायम असून, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दिंडोरी व पेठ रोडवरील काही ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी कायमच कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे स्वच्छता मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

दिंडोरी-पेठ रोड ब्लॅक स्पॉट कायमच

नाशिकच्या पंचवटीत जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. दिंडोरी व पेठ रोडमार्गे गुजरातहून येणाऱ्या भाविकांना मात्र शहरात प्रवेश केल्यानंतर काही अंतरावर पोचताच कचऱ्याचे दर्शन घडत आहे. तसेच शहरातील नित्याने ये-जा करणारे पादचारी व वाहनचालकांनाही रोजच हे चित्र बघावयास मिळते. यामुळे साचलेला कचरा घंटागाडी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी उचलावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कचऱ्याचे ग्रहण सोडावे, पंचवटीकरांकडून मागणी

पंचवटी विभागीय कार्यालयात होणाऱ्या प्रभाग सभेत कचऱ्याच्या मुद्याहून स्वच्छता विभागास लोकप्रतिनिधी नेहमीच धारेवर धरतात. याच सभेत सभापतींनी सूचना करताच संबंधित अधिकारी समस्येचा निपटारा करतो, असे सांगतात. परंतु, प्रत्यक्षात कामे करत नसल्याने समस्या कायम आहेत. स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या मनपा प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून शहराच्या सौंदर्याला लागलेले कचऱ्याचे ग्रहण सोडावे, अशी मागणी पंचवटीकरांकडून केली जात आहे.