दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा

दिवाळी गर्दी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रकाशाचा सण म्हणून ओळख असलेल्या दिवाळी या सणाला अवघे काही दिवस उरले असून, बोनस हाती पडल्याने कर्मचारी, कामगारांनी खरेदीसाठी रविवारचा मुहूर्त साधल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

दिया www.pudhari.news
नाशिक : प्रकाशपर्व म्हटलं की दिवा आलाच, या दिपोत्सवाला उजळून काढण्यासाठी पणती खरेदी करताना आई आणि चिमुकली. (छाया: रुद्र फोटो)

 

दरवर्षी स्वदेशीपेक्षा विदेशी, त्यातही चायनामेड वस्तूंचा मोठा बोलबाला बघावयास मिळतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतासाठी चीनच्या कुरापती वाढल्याने, भारतीयांनी चायनामेड वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकत स्वदेशीचा नारा दिला आहे. विशेष बाब म्हणजे केवळ ग्राहकच नव्हे, तर व्यापार्‍यांनीही स्वदेशीच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविल्याने बाजारात सर्वत्र स्वदेशी वस्तूंचीच रेलचेल बघावयास मिळत आहे. त्यामुळे मात्र चीनला मोठा दणका बसला आहे. विशेषत: दिवाळी, दसरा या दोन मोठ्या सण-उत्सव काळात चायनामेड वस्तूंचा मोठा बोलबाला असतो. ‘चले तो चाँद तक, नही तो शाम तक’ याप्रमाणे या वस्तू ओळखल्या जात असल्या, तरी त्या स्वदेशी वस्तूंच्या तुलनेत बर्‍यापैकी स्वस्त असल्याने ग्राहक चायनामेड वस्तू खरेदीकडे अधिक आकर्षित व्हायचा. परंतु, चीन शत्रूराष्ट्राच्या पंगतीत बसल्यानंतर आता भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक भारत सरकारने चीनच्या वस्तू आयातीवर अगोदरच बंदी घातली आहे. मात्र, चोरट्या मार्गाने या वस्तू भारतात आणण्याचे कटकारस्थान केले जात आहे. शिवाय चायनामेड वस्तूंवर बंदी घालण्यापूर्वी भारतात मोठ्या प्रमाणात चायना वस्तूंचा स्टॉक उपलब्ध असल्याने, विक्रेत्यांकडून दर दिवाळीला तो बाहेर काढला जात असल्याचे बघावयास मिळत आहे. दरम्यान, ग्राहकांनीच स्वदेशीचा नारा देऊन चायनामेड वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने, विक्रेत्यांनीही ग्राहकांच्या मोहिमेला बळ दिले आहे.

 

दिवाळी खरेदी www.pudhari.news
नाशिक : दिवाळीला एकच आठवडा राहिला असल्यामुळे बाजारात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिला, युवकांची गर्दी उसळली आहे. (छाया : रुद्र फोटो)

 

स्वदेशी वस्तू महाग
चायनामेड वस्तूंच्या तुलनेत स्वदेशी वस्तू महाग आहेत. सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी या वस्तू महाग आहेत. स्वदेशी बनावटीच्या वस्तू टिकाऊ असल्याने त्या तुलनेत महाग विकल्या जातात. सकारात्मक बाब म्हणजे या किमतीचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. केवळ स्वदेशी बनावटीच्या वस्तू खरेदी करणे एवढाच आग्रह ग्राहकांकडून केला जातो.

तसेच दिवाळी म्हटली की, खुसखुशीत चिवडा, चकली आणि लाडू अशा विविध पदार्थ खरेदीसाठीही ग्राहकांच्या मागणीनुसार कारागीर दिवाळीचे पदार्थ करण्यात व्यक्त आहेत.

 

चकली www.pudhari.news
नाशिक : दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र जोरदार तयारी दिसून येत आहे. तयार फराळाला होणारी मागणी लक्षात घेता, कारागिरांकडून आतापासूनच फराळ तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. (छाया : हेमंत घोरपडे)

हेही वाचा:

The post दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा appeared first on पुढारी.