दिलासादायक! मालेगाव, नाशिक मनपा हद्दीत तीन दिवसांत कोरोनाने एकही मृत्‍यू नाही 

नाशिक : डिसेंबरमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंमध्ये वाढ झालेली असताना, महिनाभरात १७७ रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद होती. जानेवारीत मात्र मृतांचा आकडा सध्या तरी नियंत्रणात आहे. तीन दिवसांत नाशिक शहर, मालेगाव आणि नाशिकला उपचार घेत असलेल्‍या जिल्‍हाबाहेरील एकाही बाधिताचा मृत्‍यू झाला नसल्‍याची दिलासादायक बाब आहे. रविवारी (ता. ११) नाशिक ग्रामीणमध्ये निफाडच्‍या बाधिताचा कोरोनाने बळी गेला. दरम्‍यान, दिवसभरात १८५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, २१३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप

दिवसभरात १८५ पॉझिटिव्‍ह; २१३ कोरोनामुक्‍त,
ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २९ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात एक हजार ६७२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ११८, नाशिक ग्रामीणमधील ६०, मालेगावचा एक, तर जिल्‍हाबाहेरील सहा संशयितांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १३०, नाशिक ग्रामीणमधील ६०, मालेगावचे पंधरा, तर जिल्‍हाबाहेरील आठ रुग्‍णांचा समावेश आहे. दिवसभरात दाखल संशयित रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७८८, नाशिक ग्रामीणमध्ये सात, मालेगावला दोन, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात आठ, जिल्‍हा रुग्‍णालयातील दोन संशयित दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

निफाडच्या एकाचा मृत्‍यू 
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या एक लाख १२ हजार ४७८ झाली असून, यापैकी एक लाख ८ हजार ७९५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दोन हजार अकरा बाधितांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार २७ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते.