दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ

कांदा

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कांदादरात पुन्हा तेजी येताच केंद्र सरकार उपाययोजना करण्यासाठी तसेच वाढते दर, ग्राहकांची मागणी, नाफेड आणि एनसीसीएफकडे उपलब्ध कांदा याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि.१८) दिल्लीत आढावा बैठक घेतल्याचा दावा कांदा व्यापाऱ्यांनी दिली. मात्र, या बैठकीत काय निर्णय झाला, याची माहितीच नसल्याचा दावा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी केल्याने बैठकीबाबत आणि कांद्याबाबत गूढ निर्माण झाले. (Onion News )

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण, मिझोराम विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या वाढत्या दराचा मुद्दा प्रकाशझोतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने केंद्राकडून पावले उचलली जात असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे आढावा बैठक झाल्याचा दावा येथील व्यापाऱ्यांनी केला. येत्या काही दिवसांत यासंदर्भात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या दालनात बैठक होणार असल्याचे त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

कांद्याचे आगार असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांदा आवक निम्म्याहून अधिक घटली आहे. नवीन लाल कांदा अजूनही अल्प प्रमाणात येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने कांदादरात वाढ होत कमाल ३६११ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. आगामी पाच राज्यांच्या निवडणुका लक्षात घेत केंद्र सरकारने कांदादरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. कांद्याच्या प्रमुख दहा उत्पादक राज्यांमध्ये लागवडीमधील घट उद्दिष्टाच्या तुलनेत एक लाख ९६ हजार हेक्टर इतके प्रचंड आहे. कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात खरिपात ११ हजार, तर लेटखरिपामध्ये आतापर्यंत ४० हजार हेक्टर अशी एकूण ५१ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवडच झालेली नाही.

तुर्कस्तान, पाकिस्तानचा कांदा संपलेला असताना अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे कांद्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आखाती देशात कांद्याची मागणी वाढली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी पुढचा महिना उजाडणार आहे. त्यामुळे तूर्तास भारतीय कांद्याला आखाती देशातून चांगली मागणी राहणार असल्याने कांदादराने उसळी मारण्यास सुरु केले आहे.

दर थेट ३७०० वर

जिल्ह्यात सोमवारपासून कांदा आवक घटल्याने दरात क्विंटलमागे थेट ८०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारीदेखील कांदा आवक कमीच असल्याने दरात पुन्हा दीडशे रुपयांनी वाढ होऊन क्विंटलला ३७०० रुपये दर गेले होते. आवक वाढू नये म्हणून शेतकरीदेखील टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीला आणत आहे.

हेही वाचा :

The post दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ appeared first on पुढारी.