नाशिक : दिल्ली येथे रविवारी (ता.२९) झालेल्या एअरटेल दिल्ली मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी चमकदार कामगिरी करतांना यशाची परंपरा कायम राखली आहे. अर्ध मॅरेथॉन गटातून भारतीय महिला गटातून नाशिकच्या संजीवनी जाधव हिने दुसरा तर कोमल जगदाळे हिने तिसरे स्थान पटकावले आहे. भारतीय पुरूषांच्या गटात दिनेश कुमार व किसन तडवी चमकले.
दिल्लीला होणार्या या मॅरेथॉन स्पर्धेत दरवर्षी नाशिकच्या धावपटूंचा सहभाग असतो. यापूर्वी या स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी विजेतेपदापर्यंत मजल मारली आहे. दरवर्षी स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंकडून स्पर्धेत अव्वल कामगिरी केली जात असते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सुरक्षिततेच्या विविध उपाययोजनांसह ही स्पर्धा पार पडली. यावर्षीच्या स्पर्धेत नाशिकच्या एकलव्य ॲथलेटिक्स ॲण्ड स्पोर्टस् इन्स्टिट्यूट व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा प्रायोजित सात धावपटूंनी सहभाग नोंदविला होता.
हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार
या स्पर्धेत अर्धमॅरेथॉन भारतीय महिला गटातून नाशिकच्या संजीवनी जाधव हिने सहभागी होत दुसरा क्रमांक पटकावला. २१ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी तिने १ तास १३ मिनीटे वेळ घेतला. तिच्यापाठोपाठ नाशिकच्याच कोमल जगदाळे हिने तिसरे स्थान राखले. कोमलने ही स्पर्धा १ तास १४.०४ मिनीटांत पूर्ण केली. या गटातून पारूल चौधरी हिने १ तास १२.१८ मिनीटे अशी वेळ नोंदवत अव्वल स्थान राखले.
हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली
पुरूषांमध्ये दिनेश, किसन चमकले
भारतीय पुरूष गटातून सहभागी झालेल्या दिनेश कुमारने सातवे स्थान राखले. त्यासाठी त्याने १ तास ५.४४ मिनीटे अशी वेळ नोंदविली. तर त्याच्यापाठोपाठ किसन तडवी याने १ तास ७.१५ मिनीटे वेळ नोंदवितांना नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या गटातून अविनाश साबळे याने १ तास ००.३० मिनीटे वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर श्रीनु बुगाथा याने १ तास ०४.१६ मिनीटांची नोंदवत दुसरा तर दुगा बुधा याने १ तास ०४.१९ मिनीटे वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला. या धावपटूंसोबत "साई'चे प्रशिक्षक विजेंद्र सिंग दिल्ली येथे उपस्थित होते.