दिवसभरातील रुग्णसंख्या चौथ्या दिवशी दोन हजारांपुढेच; जिल्ह्यात दोन हजार ३८३ पॉझिटिव्‍ह

नाशिक : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी दोन हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले. शनिवारी (ता. २०) दिवसभरात दोन हजार ३८३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर आठ ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. दरम्‍यान, दिवसभरात ८४८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत एक हजार ५२७ ने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार २४२ वर पोचली आहे. 

शनिवारी झालेल्‍या आठ मृतांमध्ये तीन नाशिक शहरातील तर, पाच रुग्ण नाशिक ग्रामीण भागातील आहेत. शहरातील खुटवडनगर येथील ८३ वर्षीय महिला, पाथर्डी फाटा येथील ६० वर्षीय पुरुष, त्रिमूर्ती चौकातील ९० वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला. नाशिक ग्रामीणमध्ये चांदवड येथील ६२ वर्षीय पुरुष, देवगाव (ता. निफाड) येथील ६० वर्षीय महिला, जळगाव नेऊर (ता. येवला) येथील ७४ वर्षीय पुरुष, सय्यद पिंप्री (ता. नाशिक) येथील ६२ वर्षीय पुरुष आणि वेलापूर (ता. निफाड) येथील ८० वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला. दिवसभरात नाशिक शहरातील एक हजार ३९९, नाशिक ग्रामीणमधील ७८५, मालेगाव येथील १६६, तर जिल्‍हाबाहेरील ३३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ४२२, नाशिक ग्रामीणमधील ३२८, मालेगाव येथील ८८, जिल्‍हाबाहेरील दहा रुग्‍णांचा समावेश आहे. 

 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

पाच हजार १०१ अहवाल प्रलंबित 
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार १०१ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ८१४, नाशिक शहरातील एक हजार ३२५, मालेगावच्‍य ९६२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणातील दोन हजार ४५० रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील दोन हजार ३०९ रुग्ण आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात आठ, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात रुग्‍ण दाखल झाले.  

  हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा