दिवाळीचे साखरवाटप अद्यापही सुरूच! सहा लाख प्राधान्य कुटुंबाला होणार लाभ

येवला (नाशिक) : दिवाळीच्या तोंडावर प्राधान्य कुटुंबातील तसेच एपीएल (केशरी) शेतकरी लाभार्थ्यांच्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने साखर वाटपाचा निर्णय घेतला खरा; मात्र वेळेचे तारतम्य न पाळल्याने दिवाळी होऊनही अद्याप साखरवाटप सुरूच आहे. या महिनाअखेरपर्यंतही साखरवाटप पुरवठा पूर्ण होऊ शकणार असून, याचा लाभ सुमारे सहा लाख कुटुंबांना होईल.

सहा लाख प्राधान्य कुटुंबाला अल्प दरात एक किलोचा लाभ

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दर महिन्याला अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून ३५ किलो धान्यासोबत एक किलो साखर दिली जाते. अर्थात, ती कितपत पुरते हा संशोधनाचा भाग आहे. यासोबतच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १४ जिल्ह्यांतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना २० रुपये किलोप्रमाणे दिवाळीसाठी प्रतिकुटुंब एक किलो साखर वाटपाचा निर्णय शासनाने ५ नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. राज्यात एक लाख ३९ हजार क्विंटल साखरेचे वाटप होणार असून, त्यासाठी ५३ कोटी रुपये शासनाने मंजूर केले. याची अंमलबजावणी होताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १० नोव्हेंबरला आदेश निघाले. त्यानंतर तालुका स्तरावर याच्या हालचाली सुरू झाल्या. परिणामी ऐन दिवाळीत ही साखर पोचलीच नाही.

सद्यःस्थितीत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाटप

पुरवठा विभागामार्फत सूचना दिल्यानंतर रेशन दुकानदारांनी चलन भरले. परंतु दिवाळीच्या सुट्या मध्ये आल्या. त्यानंतर साखर अनेक ठिकाणी पोचली असून, त्याचे वाटप सुरू आहे. सद्यःस्थितीत ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाटप झाल्याचे सांगितले जाते. मात्र दिवाळीनंतरच या साखरेचा लाभ बहुतांश कुटुंबीयांना मिळाला आहे. जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांची संख्या सहा लाख सहा हजार असून, त्यासाठी सहा हजार ३२ क्विंटल साखर नियतन मंजूर केले. जिल्ह्यातील तालुकानिहाय शिधापत्रिकांच्या संख्येनुसार या साखरेचे वाटपही मंजूरही झाले, त्यानुसार वाटप सुरू आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी कार्डधारकांना प्रतिकार्ड एक किलोप्रमाणे ही साखर दिली जात असून, बाजारभावाच्या तुलनेत अर्ध्या दराने मिळत असल्याने लाभार्थ्यांकडून स्वागतच झाले. मात्र ऐन दिवाळीत या साखरेचा लाभ झाला असता, तर दिवाळीचा गोडवा अजून वाढला असता, असे लाभार्थी सांगत आहेत.

येवल्यात वाटप पूर्णत्वाकडे

तालुक्यासाठी दिवाळीपूर्वी एक दिवस आदेश येताच बँका सुरू असल्याने तातडीने शंभरावर दुकानदारांनी चलन भरून साखरेची मागणी केली. त्यातील काहींना साखर उपलब्ध झाल्याने दिवाळीच्या कालावधीतच साखरेचे वाटप झाले, तर उर्वरित लाभार्थ्यांना अजून वाटप सुरू असून, पुढील दोन दिवसांत हे वाटप पूर्ण होईल, अशी माहिती पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे यांनी दिली.

दिवाळीसाठी अशी वाटली साखर..
तालुका - लाभार्थी - मंजूर नियतन (क्वि.)

सटाणा - ४६५८२ - ४६४
चांदवड - २७४५४ - २७३
दिंडोरी - ३३४४० - ३३३
देवळा - १८३७० - १८२
धाविअ नाशिक - ९३०२३ - ९२९
धाविअ मालेगाव - २८९०१ - २८८
इगतपुरी - १९१२३ - १९०
कळवण - २६७५१ - २६६
मालेगाव - ६२२८१ - ६२०
नाशिक - ५५७४१ - ५५५
निफाड - ६३३६८ - ६३२
नांदगाव - १८१६७ - १८०
मनमाड - १३४६८ - १३४
पेठ - ९५४६ - ९४
सिन्नर - ३९६४८ - ३९४
सुरगाणा - ८७२८ - ८६
त्र्यंबकेश्वर - १२०४३ - ११९
येवला - २९५०० - २९३
एकूण - ६०६१२४ - ६०३२