दिवाळीतील अन्नधान्यवाटप महिन्यानंतर जाहीर; प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ

मालेगाव (जि.नाशिक) : दिवाळीनंतर शिधापत्रिकाधारकांना दिवाळीतील अन्नधान्यवाटप जाहीर झाले आहे. शहरातील शिधापत्रिकाधारक व विविध योजनांसाठी पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी नोव्हेंबर, डिसेंबरचे वाटप धान्य वितरण अधिकारी पी. बी. मोरे यांनी जाहीर केले आहे. शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना नोव्हेंबर २०२० या महिन्याचे धान्य दुकानात उपलब्ध करून दिले असून, त्याचे खालीलप्रमाणे वाटप करावे, असे आवाहन मोरे यांनी केले.

शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर देय

अंत्योदय योजना- २६ किलो गहू (दोन रुपये प्रतिकिलो), नऊ किलो तांदूळ (तीन रुपये प्रतिकिलो), एक किलो साखर (२० रुपये प्रतिकिलो), अंत्योदय- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ व प्रतिशिधापत्रिका एक किलो हरभराडाळ मोफत. प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना- तीन किलो गहु (दोन रुपये प्रतिकिलो), दोन किलो तांदूळ (दोन रुपये प्रतिकिलो), एक किलो साखर (२० रुपये प्रतिकिलो). दिवाळीनिमित्त अंत्योदय व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखर देय आहे. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

कोरेाना संसर्ग लक्षात घेता काळजी घेण्याचे आवाहन 
शिधापत्रिकाधारकांनी धान्य घ्यावे, कोरेाना संसर्ग लक्षात घेता एकाच वेळी दुकानात गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, स्वस्त धान्य दुकानदार तसेच धान्य कमी-जास्त देणे, जादा रकमेची आकारणी करणे, धान्याची पावती न देणे याबाबत काही तक्रारी असल्यास धान्य वितरण अधिकरी व विभागनिहाय असलेल्या पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे मोरे यांनी कळविले आहे.  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा