Site icon

दिवाळीत नाशिककरांकडून दणक्यात खरेदी ; सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे दोन वर्षे कोंडी सहन केलेल्या नागरिकांनी यंदा मात्र दणक्यात खरेदी करीत दिवाळी साजरी केली. सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम नोंदविला गेल्याने व्यापारीवर्ग चांगलाच सुखावला आहे. दोन वर्षे अंधकारमय आठवणींना बाजूला सारत खर्‍या अर्थाने यंदा व्यापार्‍यांकरिता प्रकाशपर्व सुरू झाल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले.

कोरोनामुळे दोन वर्षे बाजारपेठेसाठी खूपच खडतर होते. या काळात अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. नागरिकांवरदेखील बरेच बंधने असल्याने, त्यांनाही गुंतवणुकीला या काळात फारसा वाव मिळाला नाही. त्यामुळे यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरा करताना प्रत्येकाच्याच चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठी उलाढाल झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि.24)देखील मोठ्या संख्येने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. विशेषत: कपडा बाजारात सकाळपासूनच मोठी गर्दी होती. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा त्याचबरोबर सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिकरोड, देवळाली या उपनगरांमधील बाजारातही खरेदीची मोठी धूम दिसून आली.

लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या लक्ष्मीच्या मूर्ती, फोटो, हळद-कुंकू, श्रीफळ, केरसुणी, रांगोळी, लाल कपडा, कापूर, अगरबत्ती आदी पूजेच्या साहित्यात मोठी उलाढाल झाली. त्याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही मोठ्या उलाढालीचा विक्रम झाल्याचे दिसून आले. टीव्ही, फ—ीज, वॉशिंग मशीन यासह इतर वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. मोबाइल मार्केटमध्येही तेजी दिसून आली. तरुणाईने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत मोबाइलची खरेदी केली. एकूणच सर्वच क्षेत्राला दिवाळीनिमित्त मोठी झळाळी मिळाल्याने, व्यापारीवर्ग सुखावला आहे.

सराफ बाजारात कोटींची उड्डाणे
कोरोनाच्या दोन वर्षांच्या तुलनेत गेल्या दसर्‍याच्या मुहूर्तावर सराफ बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे आकडे समोर आले होते. मात्र, दसर्‍याच्या तुलनेत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कोटीच्या कोटींचे उड्डाणे झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. सोने-चांदीच्या दर बर्‍यापैकी स्थिर असल्याने, हीच संधी साधत नाशिककरांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले. दुपारी 3 नंतर ग्राहकांनी खर्‍या अर्थाने सराफ बाजारात गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती. शहरात वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी सुरू केलेल्या सोने-चांदी विक्रीच्या दालनातही रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून आली. सोमवारी (दि.24) सोन्याचा दर 24 कॅरेटकरिता प्रति 10 ग्रॅमसाठी 51 हजार 320 रुपये इतका नोंदविला गेला, तर 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅमसाठी 47 हजार 40 रुपये इतका नोंदविला गेला. दसर्‍याच्या मुहूर्तावर हेच दर एक हजार रुपयांनी कमी होती. मात्र, त्याचा ग्राहकांवर फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नसल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

अनेकांचे गृहस्वप्न पूर्ण
आपले स्वत:चे घर असावे याची सर्वाधिक जाणीव कोरोना काळात झाली. त्यामुळे अनेकांनी गृह खरेदीचे कोरोना काळातच नियोजन केले होते. सध्या शहराच्या चहूबाजूने एकापेक्षा एक असे गृहप्रकल्प सुरू आहेत. परवडणार्‍या घरांपासून ते आलिशान घरे उपलब्ध असल्याने ग्राहकांसमोर भरपूर पर्याय होते. अशात अनेकांनी साइट व्हिजिट करीत आपल्या स्वप्नातील गृहखरेदी केले. अनेक प्रकल्प पूर्ण असल्याने, ग्राहकांना तत्काळ रेडीपजेशन देता आले. फ्लॅटच्या तुलनेत रो-हाउस खरेदीकडेही मोठा कल असल्याचे दिसून आले.

फटाके विक्रीतही मोठी उलाढाल
दिवाळीत आसमंत उजळून टाकणार्‍या फटाक्यांच्या विक्रीतही मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. दोन वर्षांच्या खंडानंतर फटाक्यांच्या खरेदी-विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा फटाक्यांच्या किमतीत 40 ते 60 टक्क्यांची वाढ झाली. मात्र, अशातही ग्राहकांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके खरेदीसाठी बाजारात नाशिककरांची झुंबड उडाली होती.

वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकांनी दुचाकी-चारचाकी खरेदीचे स्वप्न पूर्ण केले. विशेषत: चारचाकी खरेदीकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कल असल्याचे दिसून आले. अनेकांनी दसर्‍याच्या तसेच धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर बुकिंग करून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर डिलिव्हरी घेतली. इलेक्ट्रिक कारलाही मोठी पसंती असल्याचे दिसून आले. विक्रेत्यांच्या मते, एक हजारांवर दुचाकी तर 350 ते 400 कारची विक्री झाली.

हेही वाचा :

 

The post दिवाळीत नाशिककरांकडून दणक्यात खरेदी ; सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम appeared first on पुढारी.

Exit mobile version