दिवाळीत व्यापारीवर्गास ‘लक्ष्मी’ पावली

नाशिक दिवाळी खरेदी गर्दी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीनिमित्त ग्राहकांनी केलेल्या यथेच्छ खरेदीमुळे बाजारपेठांना ‘लक्ष्मी’ पावली आहे. लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी खरेदी केल्याने बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली. लहानांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांना ग्राहकांनी प्रतिसाद दिल्याने व्यापारीवर्ग सुखावला आहे.

सुवर्ण बाजारसह, वाहन, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स बाजार, कापड बाजार, फूलबाजार, पूजा साहित्य, किराणा, फटाका मार्केट अशा सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केल्याने विक्रेत्यांना मोठा बूस्ट मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक मंदीचे सावट अन् कोरोनाचे संकट यामुळे व्यापारीवर्ग संकटात सापडला होता. महागाईमुळे बाजारातील मंद स्थिती चिंताग्रस्त करणारी असल्याने, दिवाळीत ग्राहकांच्या क्रयशक्तीत वाढ होणार काय? अशी भीतीही जाणकारांकडून व्यक्त केली जात होती. परंतु ग्राहकांनी ही भीती चुकीची ठरवत यथेच्छ खरेदी केली.

सर्वच क्षेत्रात उलाढाल झाल्याने यंदाच्या चैतन्य पर्वात व्यापारीवर्ग सुखावला आहे. वाहन बाजारात तीन हजारांपेक्षा अधिक दुचाकी विक्रीचा, तर १२ चारचाकी विक्रीचा अंदाज व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त पाचशे ते सहाशे फ्लॅट विक्री झाली असून, सराफ बाजारात तब्बल दीडशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे. कापड बाजारात ७० ते ८० कोटींपेक्षा अधिक उलाढालीचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारातील आकडेही कोट्यवधींच्या घरात आहेत. पूजा साहित्यांमधून लहान व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे फूलबाजारातील तेजीमुळे शेतकरी सुखावला आहे. किराणा साहित्यातून मोठी उलाढाल झाल्याने, बाजारावरील मरगळ दूर झाल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

बोनस अन् खरेदी

यंदा सर्वच क्षेत्रात समाधानकारक चित्र बघावयास मिळाले असून, कामगारवर्गांना मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी बोनस जाहीर केले होते. त्यातून जोरात खरेदी झाल्याने, बाजारात मोठी उलाढाल झाली आहे. वाहन बाजारात नव्या वाहनांसह जुन्या वाहनांनाही मोठी मागणी असल्याचे दिसून आले. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे कामगारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा :

The post दिवाळीत व्यापारीवर्गास 'लक्ष्मी' पावली appeared first on पुढारी.