दिवाळी उलटताच गुणकारी शेवगा बाजारात दाखल; गाठली किलोस शंभरी 

मालेगाव (जि.नाशिक) : दिवाळी उलटताच गुणकारी शेवगा बाजारात दाखल झाला आहे. गेल्या काही वर्षांत मिळत असलेल्या भावामुळे शेवगा हे बळीराजाचे हक्काचे पीक होऊ पाहत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी शेवगा लागवड वाढली आहे. जिल्ह्यातील कसमादेत हजार ते बाराशे हेक्टरवर शेवगा फुलला आहे. सध्या बाजारात शंभर रुपये किलोने शेवगा विकला जात आहे. 

कमी पाण्यात येणारे शाश्‍वत पीक
कमी पाण्यात येणारे शाश्‍वत पीक म्हणून शेवग्याकडे पाहिले जाते. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवाळीपर्यंतचा कालावधी सोडला तर वर्षभर शेवगा उपलब्ध होतो. यंदा ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नवीन शेवगा बाजारात येण्यास उशीर झाला. दिवाळी उलटताच माल बाजारात येऊ लागला आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

आठवड्यानंतर मुबलक शेवगा बाजारात
जिल्ह्यातील कसमादेत कोरडवाहू क्षेत्रात शेवग्याचे पीक घेण्यात आले आहे. कमी पाण्यात पीक येत असल्याने कसमादेतील दुष्काळी पट्ट्यात या पिकाला पसंती मिळाली. जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा व नाशिक या तालुक्यांमध्ये शेवग्याचे पीक घेतले जात आहे. पीकेएम, कोकण रुचिरा, ओडीसी आदी जातींची लागवड करण्यात आली आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मुबलक शेवगा बाजारात येईल. उत्पन्न वाढले असले तरी गुणकारी असल्याने या वर्षीदेखील भाव टिकून राहतील. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

शेवगा ठरणार फलदायी 
शेतकऱ्यांना इतर पिकांच्या तुलनेने शेवग्याने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. कोरोना लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले. सद्यःस्थितीत पीक चांगले असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये भाव दोनशे रुपये किलोपर्यंत गेला होता. या वर्षी दीडशे रुपयांपर्यंत भाव जाईल असे मानले जात आहे. कोरोना परिस्थिती पूर्णपणे निवळली व निर्यात वाढली तर यंदा शेवगा शेतकऱ्यांना निश्‍चितच फलदायी ठरू शकेल.

प्रतिकूल परिस्थितीतदेखील पीक चांगल्या स्थितीत आहे. हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा आहे. तरुण शेतकऱ्यांचा शेवग्याकडे असलेला कल पाहता उन्हाळी हंगामात लागवडीत आणखी वाढ होईल. -ॲड. महेश पवार, शेवगा उत्पादक, रावळगाव 

वाशी बाजारात महाराष्ट्र व गुजरातमधून शेवगा येत आहे. सरासरी शंभर ते ११० रुपयांपर्यंत भाव आहे. या वर्षी अतिपावसामुळे तमिळनाडूत शेवग्याचा हंगाम उशिरा सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेवग्याचे दर टिकून राहतील. -ब्रिजेश शुक्ल, शेवगा अडतदार, मुंबई