
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिवाळी सणात आपण सहकुटुंब बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर थोडे थांबा! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटांच्या दरात अवाच्या सव्वा वाढ केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबादसह अन्य मार्गांवर दुप्पट ते तिप्पट दर आकारले जात आहेत. त्यामुळे कोराेनाच्या दोन वर्षांनंतर बाहेरगावी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिककरांचा खिसा रिता होेणार आहे.
कोरोना निर्बंधमुक्तीमुळे दिवाळीत सर्वत्र उत्साह आहे. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे गावाची नाळ आणि आप्तस्वकीय दुरावले होते. त्यामुळे चालूवर्षी एकत्रित कुटुंबीयांसमवेत प्रकाशाचा सण साजरा करण्याचे प्लॅनिंग नाशिककरांनी केले खरे. परंतु, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी दिवाळीचेनिमित्त साधत तिकिटदरांत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे गावाकडे जाण्याचा प्रवास महागला आहे. एरवी मुंबईसाठी ४०० ते ५०० रुपये तिकीटदर मोजावे लागणाऱ्या नाशिककरांना सध्या ८०० ते १,००० रुपये द्यावे लागत आहेत. पुण्याचा प्रवासही महागला असून, एरवी सिझन नसताना ५०० ते ६०० रुपये तिकीटदर खासगी कंपन्या आकारता. दिवाळीचे कारण पुढे करत हेच दर १,२०० ते १,४०० रुपयांवर करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ साेसावी लागत आहे.
नाशिकमधून नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादसह धुळे व जळगाव तसेच राज्याबाहेर अहमदाबाद, हैदराबाद अशा विविध मार्गांवर खासगी टॅव्हल्स कंपन्या सेवा देतात. परंतु, या सर्व मार्गांवर सध्या २,००० ते २,२०० रुपये एका तिकिटासाठी मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या तीन तासांवर असलेल्या धुळ्यासाठी ८०० ते १००० तर जळगावसाठी २,००० हजार रुपये असे अवाच्या सव्वा दर कंपन्या आकारत आहेत. या दोन शहरांच्या दरांबाबत कंपन्यांना विचारणा केली असता लांबपल्ल्याची बस असल्याचे सांगत दर कमी होेणार नाही, असे मुजोर उत्तरदेखील प्रवाशांना मिळते आहे. त्यामुळे गावाकडे दिवाळीचा सण साजरा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिककरांचे दिवाळे निघाले आहे.
आरटीओचे दुर्लक्ष अन् रोष
ऐन दिवाळीत खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकिटांच्या दरात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसते आहे. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) या प्रकाराकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. आरटीओे प्रशासनाला कंपन्यांच्या भल्याचे पडल्याचे सांगत प्रवाशांमधून रोेष व्यक्त केला जातोय.
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे तिकीटदर (रु.)
शहर ऑफ सिझन दिवाळी सिझन
मुंबई 500-600 800-1,000
पुणे 500-600 1,200-1,400
कोल्हापूर 600-700 1,800-2,000
औरंगाबाद 500-600 1,300-1,500
नागपूर 800-900 2,000-2,200
अमरावती 800-900 2,000-2,200
अहमदाबाद 900-1,000 2,000-2,200
हैदराबाद 1,000 -1,२00 2,२00-2,५00
हेही वाचा:
- पुणे : बाजारात दीपोत्सवाचा उत्साह
- ‘गोकुळ’मुळे दूध उत्पादकांत दिवाळीचा गोडवा
- आजचे राशिभविष्य (दि.२३ आक्टोबर २०२२)
The post दीपोत्सव : खासगी ट्रॅव्हल्सचे दर अवाच्या सव्वा; बाहेरगावचे नियोजन बिघडले appeared first on पुढारी.