Site icon

दीपोत्सव : फटाके बाजारात महागाईचे ‘बॉम्ब’

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके
फटाक्यांच्या उत्पादनाचा उशिरा सुरू झालेला हंगाम, फटाके तयार करण्यासाठी लागणार्‍या कागदाची टंचाई, इतर रसायनांच्या वाढलेल्या किंमती, इंधन दरवाढीमुळे महागलेली वाहतूक, कर्मचार्‍यांचा रोजगार या सर्व कारणांमुळे उत्पादन खर्च वाढल्याने यावर्षी फटाक्यांच्या किंमती तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्या असून, दिवाळीच्या फटाके बाजारात यंदा महागाईचा ‘बॉम्ब’ उडणार आहे.

गणेशोत्सव, दसरा यानंतर आता दीपोत्सवाला सुरुवात झाली असून, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीनिमित्त अनेक घरांमध्ये नियोजनाला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटले की, रुचकर फराळ, विद्युत रोषणाई आणि फटाके. दिवाळीनिमित्त फटाक्यांच्या बाजारपेठेत दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे दिवाळीसह सर्वच सणांवर काही निर्बंध होते, त्यामुळे फटाक्यांसह सर्वच बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. यंदा सर्व निर्बंध हटल्याने दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच फटाके बाजारात महागाईचा आवाज घुमू लागला आहे.

50-60% केवळ उत्पादन…

देशात फटाक्यांचे सर्वाधिक उत्पादन हे शिवकाशी येथे होत असते, तर उर्वरित उत्पादन ग्वाल्हेर, सायपूर या ठिकाणी होते. शिवकाशी परिसरात गेल्या वर्षी जानेवारीपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर आलेल्या पोंगल सणामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली, परिणामी, उत्पादन उशिरा सुरू झाले. दरवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत केवळ 55 ते 60 टक्के उत्पादन झाले असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. पेट्रोल-डिझेल, इंधनाची झालेली दरवाढ यामुळे फटाके तयार करण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने व उत्पादन घटल्याने यावर्षी फटाक्यांच्या किमती तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

कच्च्या मालाचा तुटवडा, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे फटाक्यांचे दर यंदा 40 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. यंदाच्या दिवाळीसाठी मागील वर्षी मागणी नोंदवून पेमेंट केले आहे. तरीही अजून मालाची प्रतीक्षा करावी लागत आहे. फटाक्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने व उत्पादन कमी असल्याने यंदा दरवाढ झाली आहे. – गौरव विसपुते, प्रतिनिधी, नाशिक फटाका असोसिएशन.

पावसामुळे विक्रेत्यांवर चिंतेचे ढग ….

यंदा डिसेंबरअखेरपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने सांगितल्याने व सध्या अधून-मधून जोरदार पावसाच्या सरीही बरसत असल्याने फटाका विक्रेत्यांवरदेखील चिंतेचे ढग पसरले आहे. मात्र, दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असल्याने दरवाढ होऊनही फटाक्यांची खरेदी जोरदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. फटाक्यांचे दर वाढले असले तरी आतापासून नागरिकांकडून चौकशी सुरू झाली आहे. व्यावसायिकांनी सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करावा, यासाठी जनजागृतीदेखील केली जात आहे. – प्रवीण खैरे, फटाके विक्रेता.

हेही वाचा:

The post दीपोत्सव : फटाके बाजारात महागाईचे ‘बॉम्ब’ appeared first on पुढारी.

Exit mobile version