Site icon

दीपोत्सव : रांगोळी छापे अन् स्टिकर्सचाही बोलबाला

नाशिक : अंजली राऊत
घरातील दीपोत्सव आकर्षक रांगोळीने सजविण्यासाठी प्रत्येक गृहिणीची उत्सुकता शिगेला असते. त्यासाठी घरासमोर कलात्मक व आकर्षक रांगोळी रेखाटली जाते. परंतु, सध्याच्या धावपळीच्या युगात वावरताना नोकरदार महिलावर्गाची मात्र कसरत होते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी बाजारपेठेत आकर्षक रांगोळी स्टिकर्स उपलब्ध झालेले आहेत. शिवाय रांगोळी आकर्षक दिसावी, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छापे खरेदीलाही महिलांची पसंती मिळत आहे.

नोकरदार महिलांसाठी तसेच काही महिलांना आकर्षक व रेखीव रांगोळी काढता येत नाही, त्यांच्यासाठी विविध आकर्षक असे रांगोळी स्टिकर्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विविध छापे असून, त्यामध्ये अर्धगोल, चौकोन, लांबट आकाराचे छापे, दरवाजा समोर लावण्यासाठी उंबरपट्टा आहे. असे रांगोळी स्टिकर्स मेनरोडवरील काही मोठी दुकाने व रस्त्यालगतच्या हातगाड्यांवरही लावल्याने गृहिणींचे लक्ष वेधून घेत आहे. खासकरून नोकरदार महिला वर्गाकडून अशा रांगोळी स्टिकर्सला पसंती मिळत असून, बाजारपेठेत यासाठी महिलांची गर्दी होत आहे. रांगोळीप्रमाणेच छापे व स्टिकर्समध्येही दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे दिसून येते. स्टिकर्सचे जसे अनेक प्रकार आहेत, तसेच वेगवेगळे छापेही उपलब्ध आहेत. छापे आणि स्टिकर्सचे दर आकारमानानुसार कमी जास्त आहेत. जेवढा आकार मोठा तेवढी किंमतही जास्त आहे. अगदी 10 रु. पासून तर 200 रु.पर्यंत दोन्हींचे दर आहेत. रांगोळी उजळून निघावी, यासाठी चंदेरी व सोनेरी चमकीही 10 रु. पासून 70 रु. पॅकेटप्रमाणे उपलब्ध झाली आहे. रांगोळीसाठी प्लास्टिकचे स्टेन्सिलसुद्धा आले असून, ते 10 रु. पासून तर 60 रु. पर्यंत आकारानुसार आहेत.

गृहिणींना सण-उत्सवांची तयारी, दिवाळीचा फराळ करायला वेळ अपुरा असतो. घराच्या सजावटीसाठी रेडिमेड रांगोळीचे स्टिकर्स खूप मोलाचे वाटतात. एक रांगोळीचे स्टिकर आणि दिवा प्रज्वलित केला तरी घराची शोभा वाढते. त्यामुळे मी नेहमी रांगोळी स्टिकर्सला प्राधान्य देते. – विनया देवकर, अश्विननगर, सिडको.

छापे प्रकार आणि दर असे… छापा रिंग्स, स्टॅम्प छापा, डब्बी छापा हे 20 रु. पासून आहे. रोलर – 30 रु. पासून 50 रु. पर्यंत आहेत. यामध्ये देवाचे छापे, लक्ष्मीची पावले, पोपट, कोयरी, बुधली आणि फनेलसुद्धा उपलब्ध आहेत. एकसारखी सुरेख रांगोळी काढण्यासाठी 15 रु. पासून 60 रु. पर्यंत पेन आहे.

हेही वाचा:

The post दीपोत्सव : रांगोळी छापे अन् स्टिकर्सचाही बोलबाला appeared first on पुढारी.

Exit mobile version