नाशिक : पुढारी वृत्तसेवा – खरेदीच्या बहाण्याने दुकानातून कपडे चोरून पळ काढणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. चोरलेले कपडे दोघांकडून हस्तगत करण्यात आले. मोहंमद अन्वर सय्यद (२९, रा. नानावली) व प्रवीण उर्फ चापा लिंबाजी काळे (२४, रा. कॅनॉल रोड) अशी या संशयितांची नावे आहेत.
कॉलेज रोडवरील कॅन्टाबिल शोरूममध्ये दि. २५ मे रोजी दोन चोरटे कपडे खरेदीच्या बहाण्याने गेले होते. त्यांनी दुकानातील पॅंट, शर्ट, टीशर्ट, परफ्यूम, बरमुडा आदी सुमारे २८ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला होता. चोरट्यांनी बिल न देताच पळ काढल्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वरिष्ठांसह सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला होता. त्यात परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटवली. पथकातील हवालदार विशाल काठे व नाईक प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सापळा रचला. पथकामार्फत पखालरोडवरून संशयित मोहंमद सय्यदला पकडले. चौकशीत त्याने त्याच्याकडील १७ हजार ७०० रुपयांचे कपडे पोलिसांना दिले. तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कॅनॉल रोड परिसरातून प्रवीण काळेला पकडले. दोघांचाही ताबा सरकारवाडा पोलिसांना दिला आहे.
हेही वाचा: