दुकाने बंद ठेवून कर्जाचे हप्ते, कर कसे भरणार? येवल्यात व्यापाऱ्यांचे विरोधाचे निवेदन 

येवला (जि.नाशिक) : गेल्या वर्षी प्रचंड नुकसान झाले आहे. आताही दुकाने बंद ठेवली, तर आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल. शनिवार, रविवार व्यवसायाचे दिवस असून, दुकाने बंद ठेवली तर कर्जाचे हप्ते, वीजबिल, विविध कर, कामगारांचे पगार कसे करणार, असा सवाल करून शनिवार, रविवार या दोन दिवशी दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यास येवला व्यापारी महासंघाने विरोध केला आहे. इतर दिवसांप्रमाणे या दोन दिवशीही सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

महासंघातर्फे शुक्रवारी (ता. १२) येवला उपविभागीय अधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले व येवला पालिकेला निवेदन दिले. हा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली. शनिवार व रविवारी बाजारपेठ पूर्ण बंद ठेवण्याचा आदेश पालिकेने दिला आहे. मागील संपूर्ण वर्ष लॉकडाउन व त्यानंतर दोन महिने सम-विषमच्या गोंधळात गेले असताना पुन्हा नव्याने दोन दिवस बंद ठेवले जाणार आहे. त्यात आठवडे बाजारही बंद असून, असे तीन दिवस जर व्यवसाय बंद राहणार असेल, तर संपूर्ण आठवड्याचा व्यवहार कसा पूर्ण होणार, याची चिंता व्यापाऱ्यांना आहे.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

एकीकडे वीज वितरण कंपनीची सक्तीची वसुली, पालिकेची करवसुली, बँकांचे कर्जवसुली सर्व सक्तीने सुरू आहे. त्यात तीन दिवस व्यवसाय बंद करून ठेवावा लागला, तर सर्व प्रकारचे कर व कर्जाचे हफ्ते भरायचे कसे, असा प्रश्न आहे. शासनाकडून एकप्रकारे तोंड दाबून बुक्क्याचा मार व्यापाऱ्यांना दिला जात आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कसा करावा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आ वासून उभा रहाणार आहे. व्यापारी व विविध व्यावसायिक आस्थापना शनिवार-रविवार बंद पाळण्यात असमर्थ आहेत. त्यामुळे नियम शिथिल करून न्याय द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे, दीपक पाटोदकर, रितेश बूब, सचिन सोनवणे, राहुल पारख, राहुल गुजराथी, हेमचंद्र समदडिया, योगेश तक्ते, अतुल घटे, राहुल लोणारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO