दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

आदित्य ठाकरे, दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र वेगाने विकास करत असून सर्वच क्षेत्रात राज्याला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी दिवस-रात्र काम करतो आहे. त्यामुळे दुधाचे दातही न पडलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांवर बोलताना वयाचे भान ठेवावे, असा सल्ला सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. समृद्धी टाेलनाक्याचा प्रकार गैसमजूतीतून झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ना. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार ही अफवा असल्याचे ते म्हणाले.

दाेन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आ. ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याची टीका केली हाेती. याच अनुषंगाने रविवारी (दि.२३) नाशिक दाैऱ्यावर आलेल्या ना. भुसे यांना विचारले असता त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तसेच घरात एसीमध्ये बसून उचलली जीभ लावली टाळूला सोपे असते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांची धडाकेबाज कार्यपद्धती असून ते रात्री उशिरापर्यंत काम करतात. रायगडच्या दुर्घटनेवेळी ना. शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन त्यांच्या कामाची चुणूक दाखविली, असा खोचक टोला भुसे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

सिन्नर येथील समृद्धी महामार्ग टोलनाका घटनेची माहिती घेतली आहेे. मनसेचे नेते अमित ठाकरे टोलनाक्यावर ज्या लेनमध्ये उभे होेते, तेथे आॅटोमोेड सिस्टीम आहे. तेथील प्रणालीची मुदत संपल्याने काही काळ बॅरिकेटींग दूर करण्यात गेला. गैरसमज झाल्याचे सांगताना कायदा हा सर्वांसाठी समान असल्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, जिल्ह्यात अपेक्षित पावसाअभावी धरणे भरली नसून पेरण्याही खोळंबल्या आहेत. पण दोन दिवसांपासून सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हे संकट दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. गुंडगिरीला आळा घालून नाशिक सुरक्षित राहिल याची काळजी घेण्याच्या सूचना बैठकीत दिल्याचे भुसे यांनी सांगितले.

कोठेही नाराजी नाही

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप देत २५ कोटींचा निधी दिला, अशा तक्रारी होत असल्याबद्दल ना. भुसे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सर्वपक्षीय आमदारांना त्यांच्या मागणीनुसार निधी दिला असून कोठेही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. नाशिकमधील काझीगढी, मेटघर किल्ला व अन्य जागांसंदर्भात सतर्क राहणे गरजेचे आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना केल्याचे भुसे म्हणाले.

हेही वाचा :

The post दुधाचे दात न पडलेल्याने बाेलताना भान राखावे : दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला appeared first on पुढारी.