दुधाच्या भावातही वाढ! सामान्यांच्या खिशाला कात्री; ‘असा’ आहे भाव

नाशिक रोड : आता जसा इंधनाचा दर वाढत आहे, तसा दुधाचा भावही वाढत आहे. दरवाढीचा परिणाम दूध दरवाढीवर होत असल्यामुळे सध्या दुधाचे भाव दूध विक्रेत्यांनी वाढवले आहेत. याचा परिणाम कुटुंबाच्या दैनंदिन खर्चावर होत आहे. 

लिटरमागे पाच ते आठ रुपयांचा भाव

शहरात गोठ्यापासून, तर दूध विक्री केंद्रापर्यंत दूध आणणे इंधन दरवाढीमुळे परवडत नसल्यामुळे दुधाचा भावही गगनाला भिडत आहे. सध्या म्हशीचे दूध ६५ ते ७० रुपये लिटर मिळत आहे, तर गायीचे दूध ४५ ते ४८ रुपये लिटर आहे. म्हशीच्या दुधाचे लिटरमागे पाच ते दहा रुपयाचे भाव वाढले आहेत. गायीच्या दुधाला लिटरमागे पाच ते आठ रुपयांचा भाव वाढला आहे. उन्हाळ्यात जनावरांची निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

इंधन दरवाढीचा दुधावर परिणाम 

इंधनाचे दर वाढत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. त्यामुळे दूध घरोघरी पोचवणे परवडत नाही. पर्यायाने पशुखाद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आता जसा इंधनाचा दर वाढत आहे, तसा दुधाचा भावही वाढत आहे. दरवाढीचा परिणाम दूध दरवाढीवर होत असल्यामुळे सध्या दुधाचे भाव दूध विक्रेत्यांनी वाढवले आहेत. याचा परिणाम कुटुंबाच्या दैनंदिन खर्चावर होत आहे. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

पशुखाद्याचे भाव वाढले

म्हशीची किंमत सध्या सव्वा ते दीड लाखाच्या दरम्यान आहे. गायची किंमत एक लाखापर्यंत जाते. पशुखाद्य समजल्या जाणाऱ्या एक टन उसाला बावीसशे रुपये भाव होता. आता तो तीन हजार झाला आहे. रसवंती बांडी दोन हजार रुपये होती. आता ती दोन हजार ७०० रुपये झाली आहे. सरकी बाराशे पन्नास रुपये होती, ती आता सतराशे रुपयांवर गेली आहे. त्यामुळे पशुखाद्याचे भाव वाढले आहेत. शिवाय शहरात ठिकठिकाणी घरोघरी दूध टाकायला परवडत नाही.

सध्या पेट्रोलचे भाव वाढले आहेत. गोठ्यापासून ग्राहकांच्या घरापर्यंत दूध टाकणे परवडत नाही. चारा, सरकी ढेप यांचेही भाव वाढले आहेत. उन्हाळ्यात म्हैस व गायी सांभाळणे जिकिरीचे होऊन बसल्यामुळे इच्छा नसतानाही दुधाचे भाव वाढवले आहेत. 
- गोकुळ नागरे, दूध व्यावसायिक 

दूध ही अत्यावश्यक गरज असल्यामुळे ते घेणे गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत बंद होणार नाही. बदलत्या परिस्थितीमुळे दुधाचा भाव वाढला, तर कुटुंबाचे आर्थिक बजेटही वाढवावे लागणार आहे. उदरनिर्वाह खर्च वाढणार आहे. त्याचा परिणाम रोजच्या कुटुंबाच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. 
- कल्पिता महाले-दहिवाडकर