दुप्पट भाव तरीही बाजरी विक्रीकडे पाठ! फक्त ७८९ शेतकऱ्यांची हमीभावाने बाजरी, ज्वारी विक्री 

येवला (जि. नाशिक) : एकीकडे शासकीय हमीभावाने मका विक्रीसाठी प्रचंड गर्दी होऊन हजारो शेतकऱ्यांना विक्रीपासून वंचित राहण्याची वेळ येत असताना दुसरीकडे जिल्ह्यात बाजरी व ज्वारी विक्रीकडे मात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. बाजरीला तर खासगी बाजाराच्या तुलनेत दुप्पट दर असूनही फक्त ६६६ शेतकऱ्यांनी जिल्ह्यात बाजरी तर अवघ्या १०३ शेतकऱ्यांनी ज्वारी विक्री केली आहे. 

आधारभूत किंमत योजनेंतर्गत शासकीय हमीभावाने जिल्ह्यात खरीप हंगामात मका, ज्वारी व बाजरीची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्ह्यात मका प्रमुख पीक बनत असून, दर वर्षी मका विक्रीला तोबा गर्दी होते. किंबहुना नावनोंदणी केलेल्या २० टक्केच शेतकऱ्यांची मका खरेदी होते, तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. नुकतीच ३१ तारखेला खरीप हंगामाची मका खरेदी बंद झाली असून, जिल्ह्यातील नावनोंदणी केलेल्या नऊ हजार २४८ शेतकऱ्यांपैकी केवळ तीन हजार ५१४ शेतकऱ्यांची मका खरेदी झाली आहे, तर वारंवार आवाहन करूनही ज्वारी, बाजरी विक्रीसाठी नावनोंदणीला अल्पसा प्रतिसाद मिळाला आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी 

बाजरी खासगी बाजारातच विक्री

जिल्ह्याचे ज्वारीचे क्षेत्र ८४४ हेक्टर असून, या वर्षी यात मोठी वाढ होत एक हजार ९५९ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे साहजिकच उत्पादनातही वाढ झाली. मात्र, हमीभावाने खरेदीसाठी जिल्ह्यात पाच केंद्रांवर फक्त ११४ शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नावनोंदणी केली. त्यातही फक्त १०३ शेतकऱ्यांनी सुमारे दोन हजार क्विंटल ज्वारीची विक्री केली आहे. याउलट बाजरीची प्रथमच हमीभावाने जिल्ह्यात खरेदी झाली. मुळात बाजरीचे मोठे क्षेत्र असून, सरासरी एक लाख ५३ हजार हेक्‍टर क्षेत्र असताना या वर्षी ८८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत केवळ ९३२ शेतकऱ्यांनीच बाजरी विक्रीसाठी नावनोंदणी केली होती. विशेष म्हणजे खासगी बाजारात सरासरी एक हजार २०० रुपयांचा दर मिळत असून, हमीभाव मात्र दोन हजार १५० रुपये आहे. दुपटीने दर जास्त असतानाही शेतकऱ्यांनी पहिले वर्ष असल्याने बाजरी विक्रीकडे पाठ फिरविल्याचे दिसते. नावनोंदणी केलेल्या ९३२ मध्ये तब्बल ५१० शेतकरी एकटे येवला तालुक्यातील होते, तर जिल्ह्यात केवळ ६६६ शेतकऱ्यांनी ११ हजार क्विंटल बाजरी विक्री केली. बाकीची हजारो क्विंटल बाजरी खासगी बाजारातच विक्री झाली आहे. शेतकऱ्यांनी हमीभावाच्या तुलनेत हजार रुपयांपर्यंत तफावत असूनही खासगी बाजारात बाजरी विकल्याची स्थिती असल्याने लाखो रुपयांचा चुना शेतकऱ्यांना लागला आहे, हे नक्की! 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

या वर्षी हमीभावाने प्रथमच बाजरी खरेदी झाली असून, येवल्यात खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खासगी बाजाराच्या तुलनेत हमीभाव दुपटीने असल्याने शेतकऱ्यांनी बाजरी विक्री करायला येथे प्रतिसाद दिला. त्यामुळे नक्कीच फायदा झाला आहे. ज्वारीला मात्र अल्प प्रतिसाद मिळाला. 
-बाबा जाधव, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ, येवला