दुर्गसंवर्धन मोहीम : रामशेजवर श्रमदान; दोन सैनिकी जोते झुडूपमुक्त

शिवकार्य www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची 161 वी अखंडित दुर्गसंवर्धन मोहीम रविवारी (दि.16) अजिंक्य दुर्ग रामशेजवर राबविण्यात येऊन मोहिमेत दिवसभरातील श्रमदानात भारतीय प्रजातीच्या आपट्याची, निंबारा, करंज अशा 348 रोपट्यांना आळे करण्यात आले, तर माथ्यावरील दोन सैनिकी जोत्यांना झुडपातून मुक्त करण्यात आले.

सिडको येथील आर. के. पलटण अकॅडमीचे विद्यार्थी व शिक्षकांनीही श्रमदानात सहभाग घेतला. यावेळी सर्वांना किल्ले प्लास्टिकमुक्त व कचरामुक्त ठेवा, नो सेल्फीचा वापर करा, पर्यावरण जपा, सुरक्षित दुर्ग बघा, किल्ल्यांच्या ऐतिहासिक वास्तू जपा, अशी जागृती शिवकार्यच्या वतीने करण्यात आली. दुर्गजागृती अभियानातून किल्ल्यावर येणार्‍या दुर्गप्रेमींना रामशेजचा इतिहास व किल्ला बघावा कसा, याबद्दल शिवकार्यचे संस्थापक दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी माहिती दिली. खुर्दळ यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते देवा वाघमारे, श्रम समिती प्रमुख भूषण औटे, खजिनदार किरण दांडगे, रोहित गटकळ, जयराम बदादे, रवि माळेकर यांसह दुर्गसंवर्धक उपस्थित होते.

किल्ल्यावर सुरक्षा, स्वच्छता ठेवावी
रामशेजच्या माथ्यावर व्यवसाय करणार्‍या व्यावसायिक यांनी प्लास्टिकमध्ये विकलेल्या पाणी बाटल्या व अन्न पाकिटे किल्ल्यावर अस्ताव्यस्त पडतात ते थांबवावे. तसेच किल्ल्यावर लावण्यात आलेल्या 348 भारतीय प्रजातीच्या झाडांना शेळ्या खात असल्याने त्यासंदर्भात स्थानिक ग्रामपंचायत यांना पत्र देण्यात येणार आहे. रात्री किल्ल्यावर येणार्‍या जोडप्यांना बंदी घालावी. अनुचित घटना टाळावी. येणार्‍या जाणार्‍यांची नोंदणी व्हावी, किल्ल्यावर सुरक्षेबाबत कुठलीही यंत्रणा नाही याबाबतीत वनविभाग, दिंडोरी पोलिस यांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती खुर्दळ यांनी दिली.

हेही वाचा:

The post दुर्गसंवर्धन मोहीम : रामशेजवर श्रमदान; दोन सैनिकी जोते झुडूपमुक्त appeared first on पुढारी.