दुर्दैवी! ज्या पिकासाठी केले जीवाचे रान; त्याच पिकात बळीराजाने सोडले प्राण

निफाड (नाशिक) :  गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव नसल्याने आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटे येत असल्याने कुंभार्डे यांनी प्रयोग म्हणून चायनीज काकडीचे उत्पादन घेण्याचे ठरवले होते. रात्र-दिवस काबाडकष्ट करून ते पीक फुलवले. चांगले उत्पन्न येण्याचे स्वप्न उराशी बाळगले पण त्यालाही नियतीने साथ दिली नाही. 

वैफल्यातून किशोर यांचा टोकाचा निर्णय

नांदुर्डी गावापासून एक ते दीड किलोमीटरवरील कुंभार्डे वस्तीवर किशोर कुंभार्डे हे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह राहत होते. शेती करून उदरनिर्वाह करत असताना त्यांनी निफाड येथील देना बँकेचे पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव नसल्याने आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटे येत असल्याने कुंभार्डे यांनी प्रयोग म्हणून चायनीज काकडीचे उत्पादन घेण्याचे ठरवले होते; परंतु या पिकाला हमीभाव नसल्याने त्यांना मातीमोल काकडी विकावी लागत होती. यातून आलेल्या वैफल्यातून किशोर यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

मंगळवारी (ता. २४) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास त्यांनी घरातून नुवान औषध घेऊन काकडी पिकाच्या शेवटच्या ओळीमध्ये जाऊन विषारी किटकनाशक औषध प्राशन केले. औषधाची मात्रा जास्त झाल्याने त्यांना त्रास होऊ लागला व ते ओरडायला लागले. आवाज ऐकून त्यांचे वडील तेथे पोचले असता, ही बाब लक्षात येताच त्यांना तत्काळ निफाड येथील ग्रामीण जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. निफाड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निफाडचे पोलिस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप निचळ तपास करत आहेत. 

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

काकडी पिकाच्या कडेला जाऊन विषारी औषध प्राशन

निफाडच्या उत्तर-पूर्व पट्ट्यातील नांदुर्डी येथील किशोर भास्करराव कुंभार्डे (३३) या तरुण शेतकऱ्याने शेतीसाठी वापरावयाचे नुवान हे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. राहत्या घरापासून २०० ते ३०० फुटांवर असलेल्या काकडी पिकाच्या कडेला जाऊन त्याने विषारी औषध प्राशन केले.

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद