दुर्दैवी! बँक अधिकाऱ्यांच्या ‘त्या’ नोटिशीने शेतकऱ्याला धक्का; संपविली जीवनयात्रा

सुरगाणा (जि.नाशिक) : माधव टोपले नेहमी विचारात व मानसिक दडपणाखाली राहत होते. ते या विषयावर वारंवार बोलूनही दाखवत असत. तसेच भाऊ प्रकाशचे मे महिन्यात लग्न ठरले असून, पैशांची जमवाजमव सुरू होती. पण बॅंकेच्या त्या एका नोटिशीने शेतकऱ्याने थेट टोकाचाच निर्णय घेतला.

बॅंकेच्या त्या एका नोटिशीने शेतकऱ्याचा थेट टोकाचाच निर्णय
मुलगा नीलेश टोपले यांच्या माहितीनुसार, ते वांगण येथे आई मोहनाबाई, वडील माधव, भाऊ प्रकाश यांच्यासह एकत्र राहतात. त्यांच्या वडिलांनी शेतीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरगाणा शाखेतून ट्रॅक्टर घेण्यासाठी चार लाख ५० हजार ४६७ रुपयांचे कर्ज घेतले होते; परंतु मागील काही महिन्यांपासून शेतीत उत्पादन होत नसल्याने कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे वडील नेहमी विचारात व मानसिक दडपणाखाली राहत होते. ते या विषयावर वारंवार बोलूनही दाखवत असत. तसेच भाऊ प्रकाशचे मे महिन्यात लग्न ठरले असून, पैशांची जमवाजमव सुरू होती. त्याच तणावात ते राहत होते. नीलेश टोपले गुरुवारी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांची आई शेतात गेली होती. प्रकाश नोकरीसाठी बाहेरगावी होता. घरी कोणीही नसताना माधव टोपले यांनी दुपारी दोनच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्याचे खोलीत आढळले. समोरच विषारी औषधाची बाटलीही आढळली होती.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

पोलीसांकडून घटनेचा तपास

नातेवाइकांच्या मदतीने त्यांना तत्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील शवागारात ठेवला असून, शुक्रवारी (ता. ५) शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे करीत आहेत.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

आत्महत्या केल्याची नोंद पोलिस ठाण्यात

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्याने कंटाळून येथील शेतकऱ्याने गुरुवारी (ता. ४) दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली. माधव सखाराम टोपले (वय ५२, रा. वांगण सुळे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्यांनी त्यांना ३० नोव्हेंबर २०२० ला नोटीस बजावली होती. कर्जफेडीच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली.