दुर्दैवी! मितभाषी वाहतूक पोलिसाची अचानक एक्झिट; शासकिय इतमामातील अंत्यसंस्काराने कुटुंबीयांसह गाव हळहळले

पंचवटी (जि.नाशिक) : मितभाषी वाहतूक पोलिसाच्या अचानक एक्झिटने  कुटुंबीयांसह अनेकांना धक्का बसला. गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीसावर काळाचा घाला

पेठ शहरालगत कंटेनरने चिरडल्याने जागीच ठार झालेले वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यावर शनिवारी (ता. ३०) रात्री साडेआठच्या सुमारास आडगावला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी कुमार गायकवाड वाहतूक सप्ताहानिमित्त शनिवारी दुपारी वांगणी गावाजवळील चौकात सहकाऱ्यांसह कार्यरत होते. त्या वेळी पेठकडून वापीकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. या अपघातात गायकवाड जागीच ठार झाले. अंत्यसंस्कारावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गायकवाड यांना मानवंदना देण्यात आली. लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

गावातील व्यवहार बंद
दरम्यान, सुतार गल्लीत गायकवाड यांच्या अपघाती मृत्यूची बातमी पोचताच कुटुंबीयांसह अनेकांना धक्का बसला. गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. मितभाषी असलेल्या गायकवाड यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असून, त्यांच्या मुलाला पोलिस दलात नोकरी देण्याची मागणी आडगाव तालीम संघाचे अध्यक्ष भिकाजी शिंदे यांनी केली. त्यावर शर्मिष्ठा वालावकर यांनी सकारात्मकता दर्शविली.  

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल