दुर्दैवी! शेतमालाचे नुकसान अन् कर्जबाजारीपणा; शेतकऱ्याने विहीरीत उडी घेऊन संपविली जीवनयात्रा

नामपूर (नाशिक) : शेतकरी सगळ्या जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते,  मात्र मात्र हा  जगाचा पोशिंदा आफाट काबाडकष्ट करुन, उन वारा अंगावर झेलून शेतात राबतो मात्र त्याच्या आयुष्यातील संकटे काही केल्या संपताना दिसत नाहीत... त्याला धड निसर्गाचीही साथ मिळत नाही, अशा सर्व बाजूंनी होणाऱ्या कोंडीमुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात अशीच एक घटना  नळकस ( ता. बागलाण ) येथे घडली आहे.

नळकस ( ता. बागलाण ) येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, खासगी वित्तीय संस्था, सहकारी सोसायटीचे कर्ज, शेतमालाचे झालेले नुकसान आदी बाबींना कंटाळून आपल्या शेतात बुधवारी (ता. 25) दुपारी दोन वाजेच्या सुमारास विहीरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

होते सात लाखांचे कर्ज 

हिरामण महादू देवरे ( वय 62 ) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. नळकस गावात देवरे यांची सुमारे दोन एकर वडिलोपार्जित शेती होती. यंदा महागडे कांदा बियाणे खरेदी करूनही रोगट हवामान, अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे पूर्णपणे वाया गेली. त्यापूर्वी खरीप हंगामात बाजरी व मक्याचे पिक पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यांच्यावर सहकारी सोसायटी, खासगी वित्तीय संस्था, हातउसनवार आणलेले असे सुमारे सात लाख रूपयांचे कर्जे असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

हेही वाचा>> मध्यरात्रीचा थरार! पेट्रोलपंपावरून पाच लाख लांबविले; घटना cctv मध्ये कैद

पाच तासांनंतर सापडला मृतदेह

मयत हिरामण देवरे यांच्या पत्नी यशोदाबाई शेतात पाहणी करत असताना विहीरीजवळ त्यांच्या चपला आढळून आल्या. त्यामुळे आपल्या पतीने आत्महत्या केल्याचा संशय त्यांना आला.त्यानंतर आजूबाजूचे शेतकरी धावून आले. त्यानंतर माजी सरपंच मधुकर देवरे, पोलीस पाटील विश्वास देवरे आदींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी विहीरीत त्यांचा शोध घेतला असता विहिरीला पन्नास फूटाहुन अधिक पाणी असल्याने शव मिळाले नाही. त्यानंतर मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर सुमारे पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर मयत हिरामण देवरे यांचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा>> निशब्द! अकरा दिवसांच्या बाळाला उराशी धरून सैनिकपत्नीने फोडला हंबरडा; आक्रोश आणि हळहळ

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

त्यानंतर नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ यु पी हेंद्रे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली असून तपास सुरु आहे. त्याच्यामागे पत्नी, मुलगा, सुन, मुली, भाऊ असा परिवार आहे.