दुसऱ्या मजल्यावरून धूर दिसताच नागरिकांना थरकाप; एका रात्रीतचं सर्वकाही भस्मसात

नाशिक : साडी दुकानाच्या दोन नंबरच्या मजल्यातून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. तेव्हा सारं काही भस्मसात झालेले दिसले.

एका रात्रीतचं सर्वकाही भस्मसात

रविवारी (ता. १७) रात्री साडेअकराच्या सुमारास महात्मा गांधी रोडवरील श्‍याम सिल्क ॲन्ड सारीज दुकानाच्या दोन नंबरच्या मजल्यातून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. पोलिसांनी अग्निशमन दलास माहिती दिली. अवघ्या काही मिनिटात बंब घटनास्थळी दाखल झाले. दुकानाचे मालक गुणवंत माणिकचंद मावियार यांना इतर व्यावसायिकांनी घटनेची माहिती दिली. ते घटनास्थळी दाखल झाले. नंतर दुकान उघडण्यात आले. दुकान बंद असल्याने दुकानात मोठ्या प्रमाणात आगीचे लोट आणि धूर जमा झाला होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडचणी येत होत्या. त्यांनी जेट आणि स्प्रेचा वापर करून उष्णता कमी केली. तसेच दुकानाच्या खिडक्यांच्या काचा उघडून धुरास वाट मोकळी करून दिली. मात्र, कापड आणि लाकडी फर्निचरला आग लागली होती.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

सुमारे ४० लाखांचे नुकसान झाल्याची नोंद

पंचवटी विभागीय अग्निशमन दल, पंचवटी केंद्र प्रत्येकी एक आणि अग्निशमन दल मुख्यालयाचे दोन अशा चार बंबांच्या सहाय्याने दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत विविध फॅन्सी साड्या, वातानुकूलित यंत्रे, फर्निचर असे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. रात्रीची वेळ असल्याने दुकान बंद होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. दुकानात मोठ्या प्रमाणावर साड्या होत्या. वेळीच आगीची माहिती मिळाल्याने अन्य माल वाचविण्यात अग्निशमन दलास यश आले.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता

महात्मा गांधी रोडवरील कापड दुकानास आग लागून सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले. भद्रकाली पोलिसांत आगीची नोंद झाली आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.