देवळाली टीडीआर घोटाळाप्रकरणी सबळ पुरावा हाती लागण्याची शक्यता

नाशिक : देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील टीडीआर घोटाळा चौकशी समितीने वादग्रस्त भूखंडाच्या बाजूला असलेल्या जमिनीचे जुने व नवे रेडिरेकनरचे दर मागविल्याने यातून टीडीआर घोटाळ्यासंदर्भात सबळ पुरावा हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे मुद्रांक महानिरीक्षकांकडे दर पडताळणीसाठी स्मरणपत्रे देण्यात आली आहेत. 

काय आहे प्रकरण?

देवळाली शिवारात सर्वे क्रमांक २९५/१ मधील क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेचा टीडीआर स्वरूपात मोबदला देण्यात आला. परंतु, तो देताना जागेचे स्थळ बदलण्यात आले. सिन्नर फाटा येथे आरक्षित जागा असताना ती जागा बाजारभाव अधिक असलेल्या बिटको चौकात दर्शविण्यात आली. यामुळे पालिकेला सुमारे १०० कोटींचा आर्थिक फटका बसल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहा कुटुंबातील स्नेहा शहा यांना २३ कोटी रुपये आर्थिक नुकसान झाल्याची नोटीस बजावताना चौकशी समिती गठित केली होती. या समितीने मुंढे यांची पाठविलेली नोटीस गायब करण्याचा प्रकार केला होता. गाजावाजा झाल्यानंतर रातोरात नोटीस फाइलमध्ये परतली. चौकशी समितीने मुद्रांक महानिरीक्षकांशी पत्रव्यवहार करून जागेच्या किमतीबाबत पडताळणी करण्याची मागणी केली होती. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

घोटाळ्याची चौकशी सुरू

ऑक्टोबर २०२० पासून अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. समितीने कागदपत्रांची पडताळणीसह स्थळ पाहणीही केली. समिती मार्फत रेडिरेकनर दराची तपासणी समितीमार्फत करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात तक्रारदार नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना आरोपांच्या पडताळणीसाठी बोलाविले जाणार आहे. देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक २९५ मधील अन्य जागांचे दर तपासले जाणार आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल