देवळाली टीडीआर घोटाळा प्रकरण : ‘महसूल’कडे संशयाची सुई; नोंदणी महानिरीक्षकांकडे पत्रव्यवहार  

नाशिक : देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१ मधील आरक्षित जागेचे महसूल विभागाकडे खरेदीखत तयार करताना जुना रेडीरेकनर दर नमूद केल्याने सहनिबंधकांकडे केलेली दस्त नोंदणीवर कमी किमतीनुसार मुद्रांक शुल्क आकारल्याचे या घोटाळ्यासंदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या निदर्शनास आले. मात्र, महापालिकेकडून आरक्षित जागेचा टीडीआर घेताना २५ हजार शंभर रुपये या नवीन रेडीरेकनर दर आकारल्याने यासंदर्भात नोंदणी महानिरीक्षकांकडे खुलासा मागविण्यात आला आहे. 

जुन्या रेडीरेकनर दराने खरेदीखत,
देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१, तसेच सर्व्हे क्रमांक २५५/१/अ, २५५/२/२ मधील उद्यान व शाळा आरक्षण व नाशिक शिवारातील सर्व्हे क्रमांक १५९ मध्ये क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंडावरील टीडीआर घोटाळ्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समितीकडून आज सुनावणी झाली. महापालिका हद्दीतील मौजे देवळाली गावशिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१ मध्ये जागा आरक्षित करण्यात आली होती. या जागेचा टीडीआर देताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूण १५,६३० चौरस मीटर क्षेत्राचा टीडीआर देताना जागा बदल दर्शवून अधिक किमतीचा टीडीआर लाटण्यात आला आहे. सिन्नर फाटा येथे आरक्षित जागा असताना नाशिक रोडच्या बिटको चौक ते उड्डाणपुलापर्यंत जागा दर्शविण्यात आली.

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

नोंदणी महानिरीक्षकांकडे पत्रव्यवहार 

मूळ मालकांनी आरक्षित जागा मोफत देण्याचे लिहून दिले असताना टीडीआर दिला गेला. महापालिकेने संबंधित जागामालकांना जागेचा सरकारी बाजारभाव ६,८०० रुपये प्रतिचौरस मीटर असताना टीडीआर देताना सदर जागेचा दर २५,१०० रुपये प्रतिचौरस मीटर दर्शवून टीडीआरचा मोबदला दिला. त्यामुळे पालिकेला ७५ कोटींचा आर्थिक भुर्दंड बसल्याचा आरोप झाल्याने चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली. महसूल विभागाकडे खरेदीखत करताना नवीन दर लागू करण्याऐवजी जुन्या रेडीरेकनर दराने खरेदीखत तयार करण्यात आले. सहनिबंधकांकडे दस्त नोंदणी करताना जुन्या दरानुसार मुद्रांक शुल्क आकारल्याने त्यानुसार नोंदणी महानिरीक्षकांकडे दराबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. 

 हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

१० मार्चला पुन्हा बैठक 
देवळाली शिवारातील अन्य टीडीआर घोटाळ्यासह नाशिक शिवारातील सर्व्हे क्रमांक १५९ मधील क्रीडांगण जागेच्या टीडीआर संदर्भात तक्रारीवर सुनावणी झाली. देवळाली टीडीआर संदर्भात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी आरोप केला होता. टीडीआर घोटाळ्या संदर्भात आणखी पुरावे सादर करण्याची मागणी करताना सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार १० मार्चला पुन्हा समितीची बैठक घेतली जाणार आहे.