देवळा तालुका समूह संसर्गाच्या दिशेने! तातडीने वाढवली कोरोना चाचणी केंद्रे 

देवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्याने देवळा तालुक्याची वाटचाल कोरोना समूह संसर्गाच्या दिशेने होत आहे. सध्या तालुक्यात २४३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. याला प्रतिबंध घालण्यासाठी तातडीने कोरोना चाचणीची केंद्रे वाढवण्यात आली आहेत, अशी माहिती देवळा तालुका आरोग्यधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी बुधवारी (ता.१७) दिली. 

तालुक्यातील दहिवड, मेशी, उमराणे, कणकापूर, देवळा, वाखारी या मोठ्या व इतर लहान गावांत कोरोनाबाधितांची संख्या एकदम वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. मंगळवारी (ता. १६) ७८, तर बुधवारी (ता. १७) ४६ रुग्ण आढळले. या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीसाठी गर्दी वाढू लागल्याने तातडीने आठ ठिकाणी कोविड चाचणी केंद्रे सुरू झाली आहेत. त्यात खामखेडा, मेशी, खर्डे, लोहोणेर, दहिवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालय देवळा, ग्रामीण रुग्णालय उमराणे आणि कोरोना केअर सेंटर अशा आठ ठिकाणी चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

सोमवार ते शनिवार सकाळी आठ ते अकरा या वेळेत रॅपिड ॲन्टिजेनसह आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. याच ठिकाणी पाच दिवसांचे औषध मोफत दिले जाणार आहे. तातडीच्या मदतीसाठी १०८ रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण विनाकारण घराबाहेर पडून इतरांना बाधित करतात. यावर पर्याय म्हणून त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येणार आहे. असे फिरणारे, मास्क न लावणारे, गर्दी जमा करणारे अशांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असेल, अशा गावांनी जनता कर्फ्यू लावल्यास त्यास प्रतिबंध बसण्यास मदत होईल. तालुक्यातील दहिवड, कणकापूर या गावांमध्ये असे नियोजन केले जात आहे. बुधवारी (ता. १७) २९६ जणांची चाचणी केली. त्यात ४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 

तालुक्याची आकडेवारी

आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या - १४०४ 
नगरपरिषद क्षेत्र - ४६६ 
ग्रामपंचायत क्षेत्र - ९३८ 
बरे झालेले - ११३४ 
मृत्यू - २७ 
उपचाराखाली - २४३ 

हेही वाचा - रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या नियमांचे पालन नागरिक करत नसल्याने देवळा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे विनामास्क फिरणारे तसेच सोशिअल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना जागेवर २०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 
- दत्तात्रय शेजुळ, तहसीलदार, देवळा