देवळा तालुक्यात कांचनबारी घाटात गळफास घेत आत्महत्या; अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा गुन्हा होता दाखल

देवळा (जि.नाशिक) : देवळा तालुक्यातील कांचनबारीत शुक्रवार (ता.2) रोजी एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी आत्महत्या केलेल्या इसमा  विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

कांचनबारीत एकाची आत्महत्या   
याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की खर्डे ता.देवळा येथील सागर तुळशीराम डुकळे (वय 35) मूळ राहणार रावळगाव या इसमाचा कांचनबारी घाटात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही माहिती पोलिसपाटलाने दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपूर्वी खर्डे येथे पीडित अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी सागर तुळशीराम डुकळे याच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खर्डे येथे राहणारा पीडित बालक लखन बारकू गायकवाड (वय 10) मूळ राहणार रा लळीगबारी ता.साक्री याला सागर डुकळे याने मेंढ्या चारण्यासाठी ठेऊन घेतले होते.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

मात्र या अल्पवयीन मुलावर डुकळे याने मेंढ्या सांभाळत नाही म्हणून अमानुषपणे मारहाण व चटके देऊन गंभीर दुखापत केली होती. या गुन्ह्यातून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र या मेंढपाळ व्यावसायिक सागर डुकळे याने गुरूवारी (ता.1) रोजी गळफास घेतला असला तरी कारण मात्र समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भवर करीत आहेत.  

ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन

या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी