देवळा (जि. नाशिक ) : तालुक्यात कोरोनाचा समूहसंसर्ग कायम असून, बुधवारी (ता. ३१) १४७ इतकी उच्चांकी रुग्णसंख्या आढळली. एकाच दिवशी दीड शतकाच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण पहिल्यांदाच आढळले. यामुळे तालुक्याची सक्रिय रुग्णसंख्या ८६७ झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.
तालुक्यातील देवळा- ३५, दहिवड- २४, उमराणे- १३, गुंजाळनगर- सात, मेशी- सात, लोहोणेर- आठ, खालप- सात, वासोळ- सहा अशी काही गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या जलद गतीने सुरू आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असले तरी संसर्गाचा वेगही जास्त आहे. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे तातडीने विलगीकरण करत त्यांना औषधोपचार केला जात आहे. तालुक्यात आठ ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.
देवळा शहरासह तालुक्यात गुरुवार (ता.१)पासून ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आला आहे. संसर्ग कमी होण्यास प्रतिबंध होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातही जनता कर्फ्यू गांभीर्याने राबविण्यावर भर दिला जाणार आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण घरात आहेत की बाहेर फिरतात, त्यांचे ऑक्सिजन प्रमाण योग्य आहे का, याची तपासणी तालुका आरोग्याधिकारी व त्यांचे पथक करत आहे. मास्क न लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. ज्यांना फारसा त्रास होत नाही, असे कोरोनाबाधित रुग्ण विनाकारण बाहेर फिरतात. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. अशांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण
तालुक्यातील कोरोना स्थिती
नगर परिषद क्षेत्र - ७९३
ग्रामपंचायत क्षेत्र - १,९४९
बरे झालेले रुग्ण - १,८४४
कोरोनामुळे मृत्यू - ३१
आज आढळून आलेले - १४७
उपचाराखालील रुग्ण - ८६७
एकूण रुग्णसंख्या- २,७४२
हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड