देवळा मध्ये डांबरी रस्ता पावसात वाहून गेला; नागरिकांची गैरसाेय

देवळा (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – देवळा तालुक्यातील खर्डे व वडाळा शिवारात गुरुवारी (दि.१३) रोजी दुपारी चार वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे देवनदीला पूर येऊन या पुरात दोडी धरण ते जाधव वस्तीकडे जाणारा डांबरी रस्ता वाहून गेला आहे. त्याच बरोबर याठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

खर्डे ता. देवळा येथे गुरुवारी (दि.१३) चार वाजेच्या सुमारास कांचने, वडाळा व खर्डे शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने देवनदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने परिसरातील शेतात पाणी साचले तसेच बांध देखील फुटले. पुर पाण्याने दोडी धरणातही पाणी साचले. मात्र या पुरात धरणालगत असलेला रस्ता पूर्ण वाहून गेल्याने याठिकणच्या नागरिकांची दळणवळणाची गैरसोय झाली आहे.

दमदार झालेल्या पावसात परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे खासदार भास्कर भगरे यांना समजताच त्यांनी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली आहे. तसेच झालेल्या नुकसानीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तहसील प्रशासनाकडून तसेच पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी (दि.१४) रोजी घटनास्थळी भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली आहे. पुरपाण्याने वाहून गेलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती इ व द चे अभियंता राजेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

मुसळधार पावसाने याठिकाणचा रस्ता वाहून गेल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांची दळणवळणाची गैरसोय झाली आहे. तर जून महिना सुरु झाल्याने सुरू होणाऱ्या शाळा ,महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याची दखल घेऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: