देवळा येथे 16 तासानंतर विजपुरवठा सुरु; बिघाड शोधताना कर्मचाऱ्यांची दमछाक

देवळा (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – शहरातील वीजपुरवठा तब्बल १६ तासांहून अधिक खंडीत झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शासकीय कार्यालयातील कामकाजासोबतच लहान-मोठ्या उद्योज, व्यापाऱ्यांना याचा फटका बसला. वीज वितरण कंपनीच्या कळवण येथील विद्युत विभागात तांत्रिक बिघाड झाल्याने देवळा शहराचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

बुधवारी (दि.१२) पहाटे ४ वाजेपासून गेलेली वीज सायंकाळी साडेसातपर्यंत आलेली नव्हती. कळवण येथून देवळ्याला येणाऱ्या ३३ केव्हीच्या उच्च दाब वाहिनीत बिघाड झाल्याने निवाणे, वरवंडी, मटाणेसह देवळा शहराची वीज तुटली. नेमकी का समस्या उद‌्भवली, याचा शोध घेताना वीज कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. सायंकाळी उशिरापर्यंत बिघाड शोधण्याचे काम सुरू होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत कळवण ते मटाणे येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले, परंतु मटाणे ते देवळापर्यंतचा परिसर सायंकाळनंतर अंधारात बुडाला.

तब्बल ४० ते ४५ कर्मचाऱ्यांचा ताफा देवळा ते कळवण १७ किमीच्या उच्च दाब वाहिनीसाठी उभा करण्यात येऊन दिवसभर त्यावर टप्प्याटप्याने काम करण्यात आले. चाचणी करण्यात येऊन एक-एक गावाचा वीजपुरवठा सुरळीत केला जात होता. मात्र मोठ्या लोकसंख्येचे, तालुका मुख्यालयाचे देवळा शहर सायंकाळी उशिरापर्यंत वीजेच्या प्रतीक्षेत होते. संपूर्ण दिवस वीजेअभावी शासकीय, बँकींग आदी कामे ठप्प पडलीत. त्याचा नागरिकांना फटका बसला.

अधिकारी नॉटरिचेबल

वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर अनेकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी बंद करून ठेवलेत. तर वरिष्ठांकडून प्रत्येक तासाला ‘आता येईल, तेव्हा येईल’ अशी असे सांगून वेळ मारून नेण्यात येत होती.

चौकशीची मागणी

महावितरण कंपनीकडून संपूर्ण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत पावसाळपूर्व कामे केली गेलीत. वृक्ष छाटणी करताना ही दिवसभर वीजपुरवठा खंडित केला जात होता. या कामानंतरही कळवण ते देवळा उच्च दाब वाहिनीत बिघाड होण्याचे कारण काय ? याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: