देवळ्यात ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद; शहर व तालुक्यातील गावांत शुकशुकाट

देवळा (जि. नाशिक) : तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुरुवार (ता. १)पासून सलग दहा दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आल्याने देवळा शहर व तालुक्यातील गावांत शुकशुकाट होता. पुढील दहा दिवस अशाच प्रकारे जनता कर्फ्यू राहणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यावसायिक व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

कोरोनाचा धोका व वाढत्या रुग्णसंख्येवर पर्याय म्हणून गुरुवारपासून दहादिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. देवळा शहर व तालुक्यातील गावांमध्ये सर्व व्यवहार ठप्प होते. कुणीही बाहेर पडले नसल्याने शांतता दिसून आली. दवाखाने, मेडिकल, दूध, पीठगिरणी यांच्याशिवाय सर्वच बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा महामार्ग, सौंदाणे-वघई राज्यमार्गावर तुरळक वाहतूक दिसली. ग्रामीण भागातही या जनता कर्फ्यूस चांगला प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

दहीवड, उमराणे, मेशी, खर्डे, लोहोणेर अशा मोठ्या गावांमधील सर्व व्यवहार ठप्प होते. दिवसभर कुटुंबीयांसमवेत घरातच थांबून वाचन, बागकाम, घराची स्वच्छता, छंद जोपासणे, मुलांशी संवाद, बैठे खेळ याचा आनंद नागरिक घेताना दिसले. सोशल मीडियावर सक्रिय राहत कोरोनाच्या संकटाबाबत जाणून घेण्याकडे तसेच टीव्हीवरील बातम्या पाहण्याकडे बहुतेकांचा कल दिसून आला. पुढील नऊ दिवस अशीच संचारबंदी कायम ठेवत कुणीही नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी