देवाचा धावा करा; आमची धरणे भरू द्या ! केसरकरांना भुजबळांचा मिश्किली टोला

छगन भुजबळ, दीपक केसरकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मी देवाचा धावा केल्याने कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती टळली, असे विधान केल्यानंतर अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केसरकरांनी नाशिकला यावे, देवाचा धावा करावा आणि आमची धरणे भरावी, आम्हाला आनंदच आहे, अशा शब्दांत मिश्किली टोला हाणला.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे रविवारी (दि.३०) नाशिक दौऱ्यावर होते. शिर्डी येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आठवण सांगताना, कोल्हापुरातील राधानगरी धरण भरत होते. पाणी सोडण्याची तयारी होत असताना मी देवाकडे प्रार्थना करत होतो. नेहमी पाणी सोडल्यानंतर साधारण पाच फूट पाण्याची पातळी वाढते, प्रार्थना केल्याने एक फूटदेखील वाढली नाही, असे म्हटले होते.

यावेळी मंत्री भुजबळ यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. भिडे यांनी केलेले वक्तव्य हे मोदी, शहा यांनासुद्धा आवडणार नाही. जगात असा एकही देश नाही की जिथे गांधींचा पुतळा नाही. भिडेंनी आंब्याचे एक वक्तव्य केले होते, त्यावरून आम्ही कोर्टात गेलो.

त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणून ते रोज नवीन काही बोलतात. शहर परिसरात अनेक महत्त्वाच्या रस्त्यांना खड्डे आहेत. याबाबत विचारणा केली असता, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त हे नवीन आले आहे. त्यामुळे नवीन दृष्टी प्रशासनाला लाभली आहे. लवकरच सुधारणा होईल अशी अपेक्षा करू, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

The post देवाचा धावा करा; आमची धरणे भरू द्या ! केसरकरांना भुजबळांचा मिश्किली टोला appeared first on पुढारी.