देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप 

इंदिरानगर (नाशिक) : अवघे दोन वर्षे वय असलेली चिमुरडी शिवन्न्या न्याहारकर तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून थेट पार्किंगमध्ये पडूनही सुखरूप वाचल्याने येथील नागरिकांना ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला. पाथर्डी फाटा भागात दामोदर चौकातील आोमसाई प्लाझा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर खासगी कंपनीत काम करणारे जालिंदर न्याहारकर व शिवणकाम करणाऱ्या पत्नी दीपाली आणि मुली श्रेया (८) आणि शिवन्न्यासह राहतात. 

नेमके काय घडले?

दुपारी दीपाली शिवणकाम करत होत्या, तर लहानी शिवन्न्या शेजारच्या बालिकांसोबत खेळत होती. खेळता, खेळता ती बेड रूमच्या बाल्कनीत गेली. तेथून ग्रीलवर चढत खाली बघण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. मागील बाजूस असलेल्या रो- हाउसमधील काही मुलांनी ते पाहिले आणि एकच आरडाओरड सुरू झाली. दरम्यान, दीपालीदेखील खाली आल्या. तर शिवन्न्या पोटावर पडलेली होती आणि कन्हत होती. तिला उचलेले असता ती थोडी रडली आणि चाललीदेखील. मात्र, ती व्यवस्थित असल्याचे बघून उपस्थितांचा डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता. खबरदारी म्हणून तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. यकृताला आलेली थोडी सूज वगळता तिला काहीही झाले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि सगळे आश्‍चर्यचकीत झाले. मात्र घरी आल्यानंतर तेथील संसर्गाने तिला काही दिवस जुलाब आणि उलटीचा त्रास झाला. त्यातूनही ती आता ठणठणीत झाली असून, पुन्हा मनसोक्त खेळत आहे. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता