देव तारी त्याला कोण मारी! तब्बल तीन महिने मृत्यूशी झुंजत ‘जय’चा मृत्यूवर विजय

नाशिक रोड : येथील जय डगळे याच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याने तीन महिने मृत्यूशी झुंज देऊन मृत्यूवर विजय मिळवला. मान व तोंडावर गोळ्या लागूनही जय पूर्वीसारखेच सामान्य जीवन जगू लागला आहे. त्याची ही कहाणी ऐकून भलेभलेही आश्‍चर्यचकित होत आहेत. नाशिक रोड परिसरात सध्या जय गंभीर रुग्णांच्या जगण्याचा ऑयडल बनला आहे. 

एक गोळी मानेला तर दुसरी गोळी झाडली होती गालावर

१५ सप्टेंबर २०२० ला पहाटे साडेतीनला प्रवासी घेऊन जाणाऱ्या जयला गुजरात येथे पोचल्यावर दोन चोर प्रवाशांनी लघुशंकेसाठी गाडी थांबवायला सांगून गाडीत बसलेला असताना मानेत व गालावर गोळी झाडली. त्यातील एक गोळी जयला मागून मारल्याने ती आरपार होऊन जयच्या घशातून बाहेर आली, तर दुसरी गोळी गालावर झाडली. यानंतर चोरांनी जयला गुजरातजवळील नॅशनल पार्क येथे गाडीच्या बाहेर फेकून दिले व गाडी घेऊन चोर पसार झाले. रक्तबंबाळ जयला एक तास कोणीच मदत केली नाही. सकाळी साडेसहाला तेथील नागरिकांनी नवसारी येथील हॉस्पिटलमध्ये दूरध्वनी करून रुग्णवाहिका बोलावली. जयची परिस्थिती अतिशय गंभीर असताना जयच्या नातेवाइकांनी नाशिकला गंगापूर रोड येथील खासगी हॉस्पिटलमध्ये आणून तेथे उपचार सुरू केले. 

तीन महिने लिक्विडवर दिवस

आयसीयूमध्ये असणाऱ्या जयची परिस्थिती हलाखीची होती. चाळीस, पंचेचाळीस तास उलटून गेले होते. डॉक्टरांनी जोखीम स्वीकारून शस्त्रक्रिया केली. त्यानंतर जयने व्यायाम, गोळ्या, औषधोपचार घेऊन तीन महिने लिक्विडवर दिवस काढले. त्यानंतर आता पूर्णपणे बरे होऊन जय सामान्य माणसासारखे आयुष्य जगायला लागला आहे. घशात गोळी झाडल्यामुळे गेलेली वाचाही परत आली आहे. तो आता सामान्य माणसासारखे बोलायला लागला आहे. 

हेही वाचा >  वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

माझी गाडी चोरण्याच्या उद्देशाने प्रवाशांनी नवसारी गुजरात रस्त्याला नेऊन दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडून गाडीच्या बाहेर मला फेकून दिले होते. तीन महिने नाकात नळी असताना व्यायाम, औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊन तब्येतीत सुधारणा झाली. आता नाकातली नळी काढली असून, स्पष्ट बोलू शकतो. रोज व्यायाम, योगासने करत आहे. - जय डगळे  

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या