देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेमसेल शस्त्रक्रिया नाशिकमध्ये! सातवर्षीय चिमुरडीला मिळाली उमेद 

नाशिक : देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेमसेल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नाशिकच्या लोटस इन्स्टिट्यूट ऑफ हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि अस्थिमज्जा सेंटर येथे केली आहे. रक्‍ताचा विकार असलेल्‍या सातवर्षीय चिमुरडीवर ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्‍याची माहिती डॉ. प्रितेश जुनागडे यांनी मंगळवारी (ता. २४) येथे दिली. 

रक्‍ताचा विकार असलेल्‍या सातवर्षीय चिमुरडीवर ही शस्त्रक्रिया
डॉ. प्रीतेश जुनागडे म्‍हणाले, की संगमनेरमधील सात वर्षांच्या मुलीला अप्लास्टिक ॲनिमिया होता. यामध्ये शरीरातील स्टेम सेल्समधील बिघाडामुळे शरीरात लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स तयार होत नाहीत. यामुळे चिमुरडीला दोन वर्षांपासून वारंवार रक्त आणि प्लेटलेट रक्तसंक्रमण करण्यात येत होते. अशा गंभीर आजारावर उपचार म्‍हणून दुसऱ्या स्टेम सेल्स प्रत्‍यारोपण केल्‍या जातात. परंतु सामान्‍यतः सख्ख्या भावंडांच्‍या स्‍टेमसेल्‍स जुळण्याची शक्‍यता २५ टक्‍के असते. चिमुरडीच्‍या लहान बहिणीची जन्‍मावेळी साठविलेली स्‍टेमसेल जुळेल, अशी अपेक्षा असताना, प्रत्‍यक्षात फक्‍त ५० टक्‍के जुळत होती. नाळ जिथे साठवलेली होती अशा चेन्नई येथील लाइफसेल बँक यांच्‍याकडून प्राप्त पत्रात त्‍यांच्‍याकडे रुग्णाला आवश्‍यक असलेल्‍या स्‍टेमसेल उपलब्‍ध असल्‍याची माहिती व वापरण्यास परवानगी मिळाली. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

डबल कॉर्ड स्टेमसेल प्रत्यारोपणाचा पर्याय
सामान्‍यतः एक युनिट वापरले जात असताना, दोन युनिट्स उपलब्‍ध झाल्‍याने दोन्ही स्टेमसेल्स वापरण्याचे ठरविले. दोन्ही कॉर्ड स्टेमसेल युनिट्स ९० टक्‍के एकमेकांशी आणि रुग्णाशीही जुळत होती. याशिवाय अन्य पर्याय नसल्याने डबल कॉर्ड स्टेमसेल प्रत्यारोपणाचा पर्याय निवडला. शस्त्रक्रियेच्या २२ दिवसांनंतर संक्रमित स्टेमसेल काम करू लागल्या असून, सर्व प्रकारच्या रक्तपेशी सामान्य संख्येने असल्‍याचे डॉ. जुनागडे यांनी नमूद केले. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
नाशिकच्‍या नावलौकिकात भर 
डबल कॉर्ड स्टेमसेल्सचे प्रत्यारोपण पहिल्यांदाच होत असून, स्टेमसेलचे जतन ही आवश्यक बाब आहे. असे प्रत्यारोपण नाशिकसारख्या तुलनेने लहान शहरात यशस्‍वी झाल्‍याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.