देशातील १३ टक्के तरुणांची लठ्ठपणाशी झुंज!

लठ्ठपणा,www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

भारत हा सध्या २९ वर्षांखालील तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. जागतिक आकडेवारीनुसार यातील ३९ टक्के तरुण हे अतिरिक्त वजनाचे असून, पैकी १३ टक्के तरुण लठ्ठपणाशी झुंज देत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. अलीकडे शाळांमधील अनियमित शारीरिक शिक्षण, मुलांचा वाढलेला स्क्रीनटाइम आणि बदलती जीवनशैली या प्रमुख कारणांमुळे शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. प्रत्येक शाळेमध्ये शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला वैद्यकीय शिबिरे आयोजित करून मुलांमध्ये लठ्ठपणा व योग्य आहार याबाबत जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.

कोविडमध्ये दोन वर्षे ऑनलाइन शिक्षण व मोबाइलमुळे मुलांचा स्क्रीनटाइम वाढला. मुले रात्री 11-12 वाजता झोपतात. सकाळी शाळेची वेळ 7 ची असते पण शाळा दूर असल्याने स्कूल व्हॅन लवकर येतात. मुलांच्या अपुऱ्या झोपेमुळे वर्गात शिकवताना लक्ष नसणे, चिडचिड होणे, सुस्तीमुळे मुले अधिक आळशी होत जातात. कोणतेही शारीरिक कष्ट करण्याची मानसिकता त्यांची राहात नाही. मुले निगेटिव्ह विचार करायला लागतात. त्याचा शारीरिक, मानसिक परिणाम आरोग्यावर होत आहे. एका जागी बसलेली मुले ही पालकांनी काही काम सांगितले तरी ऐकत नाहीत, असे चित्र आता घराघरात बघायला मिळते. शारीरिक कष्ट कमी झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या वाढलेल्या दिसून येतात. शाळांमध्ये अभ्यासाबरोबरच शारीरिक शिक्षणाचे धडे गिरवले जातात. मुलांच्या शारीरिक क्रियांचे काैशल्य वाढावे, त्यांच्यामध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी, यासाठी क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात पण हल्ली शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले जाड दिसून येतात. परिणामी, शालेय विद्यार्थी लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणा हा चेष्टेचा विषय असला, तरी आता त्याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. त्यामुळे लहान वयातच त्यांना थोडे श्रम केले, तरी दम लागणे, घाम येऊन रक्तदाब वाढणे, केस पांढरे होणे, मधुमेह, चष्मा लागणे अशा अनेक समस्यांना सामाेरे जावे लागत आहे.

हल्लीची मुले खूप आळशी झाली आहेत. शारीरिक श्रमाच्या अभावाने त्यांना हात-पाय दुखण्याचा त्रास हाेतो. यावर उपाय म्हणून जे विद्यार्थी शाळेच्या जवळपास राहतात, त्यांना वाहतुकीचे नियम सांगून सायकलिंगचे महत्त्व वाढावे यासाठी आम्ही त्यांना सायकलने शाळेत यायला सांगतो. तसेच दर बुधवारी विद्यार्थी, शिक्षकांसाठी योगाचे सेशन घेतले जाते.

– विजयालक्ष्मी मणेरीकर (संचालिका, ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल)

हेही वाचा : 

The post देशातील १३ टक्के तरुणांची लठ्ठपणाशी झुंज! appeared first on पुढारी.