दोन दिवसांत लाल कांद्याला अच्छे दिन; क्विटंलला १५० रुपयांची वाढ

नाशिक : अवकाळी पावसाने भिजल्याने नवीन लाल कांद्याची गुणवत्ता ठीक राहणार नाही, असा अंदाज व्यापाऱ्यांचा होता. मात्र प्रत्यक्षात चांगल्या कांद्याचा क्विटंलचा भाव तीन हजारांच्या पुढे पोचला असून, लासलगावमध्ये तीन हजार २४०, तर पिंपळगावमध्ये तीन हजार ४५१ रुपये क्विंटल या भावाने चांगल्या कांद्याची विक्री झाली. सोमवारच्या (ता. १८) तुलनेत बुधवारी (ता.२०) लाल कांद्याला सरासरी क्विटंलला दीडशे रुपयांची वाढ मिळाली आहे. 

चांगल्या कांद्याचा भाव चौतीसशेच्या पुढे 

चांगल्या कांद्याला भाव मिळत असल्याने निर्यातीसाठी पाठवल्या जाणाऱ्या कांद्याचा भाव टनाला साडेपाचशे ते सहाशे डॉलरपर्यंत पोचला आहे. मात्र पाकिस्तानचा कांदा निम्म्या भावात मिळत असल्याने आयातदारांकडून फारशी मागणी नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे होते. एकीकडे निर्यातीसाठी मागणी नसताना दुसरीकडे मकरसंक्रांतीची उत्तर भारतातील मागणी संपल्याने कांद्याच्या भावाची स्थिती काय राहणार, याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह तयार झाले होते. पण भावातील वृद्धीमुळे सारे ठोकताळे फोल ठरले आहेत. गुजरातमधील नवीन कांद्याची आवक पुढील महिन्यात, तर सुखसागर-बंगालची आवक पुढील महिन्याच्या मध्याला मोठ्या प्रमाणात होणार असल्याने नाशिकचा कांदा तोपर्यंत ‘भाव’ खाणार, अशी स्थिती पाहायला मिळते. 

बाजारपेठनिहाय क्विटंलला बुधवारी मिळालेला भाव

येवल्यात दिवसाला सरासरी १३ हजार, लासलगावमध्ये १७ ते २३ हजार, मुंगसेमध्ये आठ ते दहा हजार, चांदवडमध्ये दहा ते अकरा हजार, मनमाडमध्ये सात ते आठ हजार, सटाण्यात तीन ते साडेचार हजार, देवळ्यात साडेसहा ते साडेसात हजार, उमराणेत १५ ते १६ हजार, पिंपळगावमध्ये १२ हजार क्विंटल कांद्याची दिवसभरात विक्रीसाठी आवक होत आहे. चांगल्या कांद्याला बाजारपेठनिहाय क्विटंलला बुधवारी (ता. 21) मिळालेला भाव रुपयांमध्ये असा ः (कंसात सोमवारी विकलेल्या कांद्याचा भाव रुपयांमध्ये दर्शवतो) ः येवला- दोन हजार ९३८ (दोन हजार ८१४), लासलगाव- तीन हजार २४० (तीन हजार १००), मुंगसे- तीन हजार १५० (दोन हजार ९७७), चांदवड- तीन हजार (तीन हजार २९९), मनमाड- दोन हजार ८५० (दोन हजार ६७४), सटाणा- तीन हजार १०० (दोन हजार ९०१), उमराणे- तीन हजार १५१ (दोन हजार ९०१), पिंपळगाव- तीन हजार ४५१ (तीन हजार १५८). 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

लाल कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विटंलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ बुधवार (ता. २०) सोमवार (ता. १८) 
येवला २ हजार ६५० २ हजार ५५० 
लासलगाव २ हजार ६०० २ हजार ७७० 
मुंगसे २ हजार ८७५ २ हजार ६७५ 
चांदवड २ हजार ७०० २ हजार ७५० 
मनमाड २ हजार ६५० २ हजार ३५० 
सटाणा २ हजार ६५० २ हजार ५७५ 
देवळा २ हजार ९०० २ हजार ७२५ 
उमराणे २ हजार ८०० २ हजार ५०० 
पिंपळगाव २ हजार ८०१ २ हजार ३११  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार