दोन भावांचा भन्नाट अविष्कार! लॉकडाउनमधील वेळेचा साधला सदुपयोग; मेहनत आली फळाला

वणी (नाशिक) : स्पर्धा आणि संगणकाच्या युगात वावरताना शाळेत मिळणारे ज्ञान आणि त्यावर केलेल्या चिंतनाच्या आधारावर आपल्या बुद्धीचा वापर हा प्रत्येकाला चांगली दिशा मिळवून देतो. लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असून, सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी भरपूर वेळ मिळत असल्याने आंबेवरखेडा (ता. दिंडोरी) येथील दहावीचा विद्यार्थी कृष्णा वडजे व सहावीचा विद्यार्थी शिवम वडजे या दोघा बंधूंनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत केवळ तीन हजार रुपये खर्च करत बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे.

लॉकडाउनमधील वेळेचा साधला सदुपयोग

बॅटरीवरच्या सायकलबाबत बोलतांना कृष्णा म्हणाला, की मी आठवीला असतांना ब्लोअर तयार केले होते. त्यानंतर चार्जिंगवर स्कूटर चालते, याची प्रेरणा घेऊन आम्ही विचार केला. इलेक्ट्रिकवर चार्जिंग करून सायकल चालू शकतो का? बाजारात चार्जिंगवर चालणारी सायकल उपलब्ध आहे. पण सर्वसामान्यांना ती घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ कमीत कमी खर्चात चार्जिंगची सायकल तयार करण्याचा आम्ही निश्चय केला. यासाठी लागणाऱ्या १२ व्होल्ट व २५० वॉट मोटर, १२ व्होल्ट बॅटरी, एमसीबी स्वीच, १.५ नंबर वायर, बाइकच्या इंजिनचे स्पोकेट घेतले व इंजिनमधील टायमिंग चाइन घेतली. मोटरीचे माप घेत सायकलला मोटर बसविण्यासाठी लोखंडाची पट्टी बसवून त्या पट्टीला छिद्र पाडले व सायकलच्या पुढच्या चाकाला वेल्डिंग करत तिथे मोटार बसविली आणि स्पॉकेट चाकाला जोडले व टायमिंग चैन मापानुसार कमी करून मोटर बसविली व नंतर बॅटरी ठेवण्यासाठी स्टँड तयार करून त्यास फिट केली.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

mcb स्वीच ब्रेकजवळ जॉइन केला व वायर बॅटरीला जॉइन केली. अशा पद्धतीने सर्व जोडणी केली व बॅटरी चार्ज करून ३० मिनिटांत पाच किलोमीटर अंतर सायकल बॅटरीवर चालत आहे. सायकलला चार्जिंग बॅटरी बसविण्यासाठी एकूण तीन हजार रुपये खर्च आला. हे दोन्ही विद्यार्थी रा. स. वाघ संस्थेच्या कादवा इंग्लिश स्कूल, राजरामनगरचे विद्यार्थी आहेत. या प्रयोगाबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, सर्व संचालक व परिसरातून कौतुक होत आहे.