दोन सख्ख्या बहिणी बनल्या गावाच्या ‘कारभारी’; परिसरात ठरतोय चर्चेचा विषय

वेहेळगाव (जि. नाशिक) :  नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील माजी सरपंच आनंदा आव्हाड यांच्या कुटुंबातील दोन्ही कन्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली आहे. गावाचा कारभार पाहण्याची संधी दोन्ही सख्ख्या बहिणींना मिळाल्याने तालुक्यात, परिसरात व नातेवाइकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. 

आनंदा आव्हाड यांना दोन मुली व दोन मुले असून, त्यांच्या एका कन्येचा विवाह गावातीलच माजी सरपंच गोरख सांगळे यांच्याशी झालेला आहे. सुनंदा सांगळे यांनी सहा महिन्यांपूर्वी जनतेतून होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावले आहे. पिंपळगाव नि. (ता. चाळीसगाव) येथील अरुण नागरे यांच्याशी शोभाबाई यांचा विवाह झाला आहे. त्यांनीही नुकत्याच पिंपळगाव निवडणुकीत यश संपादन करीत सरपंचपदाचा बहुमान मिळविला आहे. दोन्हीही मुलींनी आमचे आव्हाड कुटुंबीयांचे नाव राजकीय क्षेत्रात उंचावले असून, त्यांच्या हातून दोन्ही गावांचा सर्वांगीण विकास साधला जाईल याचा आम्हा कुटुंबीयांना विश्वास व अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया आनंदा आव्हाड यांनी दिली. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​