द्राक्षनगरीचा पारा चढला! तापमानाची वाटचाल ३५ अंश सेल्सिअसकडे 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वाढलेल्या मुक्कामानंतर थंडीने काढता पाय घेतल्याने द्राक्षनगरीला उन्हाचे चटके दिवसागणिक वाढू लागले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिंपळगाव शहर व परिसराला चटके बसू लागले आहेत. पाऱ्याची वाटचाल ३५ अंश सेल्सिअसकडे सुरू झाली आहे. एप्रिल आणि मे कडक उन्हाचे महिने अद्याप बाकी असल्याने यंदाचा उन्हाळा द्राक्षनगरीची चांगलीच परीक्षा घेणार, अशी चिन्हे असल्याचे संकेत मिळत आहेत. पारा चढल्याने जिवाची काहिली शमविण्यासाठी नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहेत. 

पानगळ सुरू झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते. धूलिवंदनानंतर उन्हाचे चटके बसू लागतात. यंदा काहीसा लवकच सूर्य आग ओकू लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पिंपळगाव परिसरातील नागरिक तसा अनुभव घेत आहेत. तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून, पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत झेपावत आहे. तशी नोंद तापमानात झाली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पाऱ्यात तब्बल सात अंशांची वाढ झाली आहे. कडाक्याच्या थंडीबरोबरच कडक उन्हाळा असे दोन्ही ऋतू निफाड तालुक्यात अनुभवायला मिळत आहेत. 

एसी, कुलरचा होतोय वापर 
सकाळी नऊ-दहापासूनच उन्हाचे चटके जाणवायला सुरवात होते. दुपारनंतर ऊन तीव्र होत जाते. अचानक ऊन वाढल्याने पंखे गरागरा फिरू लागले आहेत. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता यंदा एसी व कुलर वापरास सुरवात झाली आहे. सध्याचे तापमान व हवामान विभागाचा एकूणच अंदाज बघता ‘मार्च तो सिर्फ झांकी है... एप्रिल-मे अभी बाकी है’, असे म्हणायला हरकत नाही. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

गजबजू लागले रसवंतिगृह 
उन्हाचा कडाका वाढल्याने पिंपळगाव शहरात थंड पेयांची दुकाने थाटली जात आहेत. सध्या शहरात रसवंती, आइस्क्रीम पार्लर गजबण्यास सुरवात झाली आहे. घशाची कोरड भागविण्यासाठी उसाचा रस, लस्सी, कोल्डिंग्सचा आधार घेतला आहे. ब्रॅंडेड कंपन्यांची शीतपेय, आइस्क्रीम, मठ्ठा, लस्सी, बदाम शेक, लिंबू-सरबत आदींना मागणी वाढत आहे. याशिवाय विविध फळांच्या रसाला पसंती मिळत आहे. सहकुटुंब आइस्क्रीमचा आस्वाद घेण्यासाठी फॅमिली पॅकला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत विविध प्रकारात थंडपेय, आइस्क्रीम उपलब्ध आहेत. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक उसाच्या रसाला पसंती देत आहेत. पाऱ्याबरोबर नागरिकांची गर्दी वाढत आहे. उसाचा रस आरोग्याला उपयुक्त असल्याने ग्राहक पसंती देतात. 
-संजय मोरे, संचालक, कांचन रसवंतिगृह