द्राक्षनिर्यातदारांचा ‘दुष्काळात तेरावा महिना‘;अनुदानही थांबल्याने घसरणीचा फटका

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : द्राक्ष उत्पादकांमागे संकटाचे शुक्लकाष्ट काही कमी होण्याचे नाव घेत नाही. गतवर्षी कोरोना, अवकाळी पाऊस अशा आस्मानी संकटात पिचलेल्या शेतकऱ्यांना यंदाही नवी भर पडली आहे. परदेशात पाठविण्यासाठी लागणाऱ्या कंटेनरच्या दरात तब्बल ८० टक्के वाढ झाली. शिवाय द्राक्षनिर्यातसाठी दिले जाणारे ५ टक्के अनुदानावर केंद्र शासनाने फुली मारल्याने दुष्काळात तेरावा महिना झाला आहे. कंटेनर दरवाढ व निर्यातीचे अनुदान थांबविल्याने द्राक्षाच्या दरात प्रतिकीलो २० रुपयांच्या घसरणीचा फटका बसला आहे. 

द्राक्षाच्या दरात घसरणीचा फटका
द्राक्ष हंगामाच्या प्रारंभीच नव्या संकटाचा सामना शेतकर्यांना करावा लागतो आहे. महाराष्ट्रातून द्राक्ष परदेशात जहाजाने पाठविण्यासाठी कंटेनरचा वापर होतो. गत वर्षीपर्यंत युरोप, यूके येथे पाठविण्यासाठी २२ ते २५ डॉलर असे भाडे होते. यंदा कंटेनर पुरवठा करणार्या कंपन्यांनी त्यात तब्बल ८० टक्के वाढ केली असून, त्या भाड्याचे दर आता ४१ ते ४६ डॉलर झाले आहे. सुमार २० डॉलरने भाडेवाढ झाल्याने द्राक्षनिर्यातदारांचे तोंडचे पाणी पळाले. ही दरवाढची तूट भरून काढण्यासाठी निर्यातदारांनी द्राक्षाचे सौदे कमी दराने करण्यास सुरवात केली आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

अनुदानही थांबविले 
कंटेनर दरवाढीने द्राक्षनिर्यातदार व उत्पादक त्रस्त असताना केंद्र शासनाने पुन्हा एकदा शेतकरीविरोधी धोरण स्वीकारले. द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन म्हणून शासनाकडून यापूर्वी सात टक्के अनुदान दिले जात होते. ते दोन वर्षांपासून पाच टक्क्यावर आणले. यंदा त्यावर फुली मारून अनुदान न देण्याची भूमिका केंद्र शासनाने घेतली. यामुळे द्राक्षनिर्यातदार संकटात सापडले आहेत. यापूर्वी अनुदान असल्याने खरेदी केलेल्या दरात जरी द्राक्ष परदेशात विकले गेले तरी अनुदान हा निर्यातदारांचा नफा असायचा. पण आता चारही बाजूने द्राक्षनिर्यातीला जोखंडात अडकविण्यात येत आहे. द्राक्षनिर्यातदार व्यापार्यांनी काहीशी सावध भूमिका घेतली आहे. काहींनी यंदा व्यापारच न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पिकविलेली निर्यातक्षम द्राक्ष खरेदीसाठी कमी प्रमाणात खरेदीदार येत आहे.

निर्यातीचा खोळंबा

स्पर्धा कमी झाल्याने निर्यातक्षम द्राक्षांना दराचा गोडवा नाही. द्राक्षनिर्यात होण्यासाठी शेतकर्यांनी विविध निकष पाळून द्राक्षबाग बहरविल्या. पण कंटेनर दरवाढ, अनुदान थांबविल्याने १०० रुपये किलोचे दरात २० रुपयांनी घट होईल. ७५ ते ८० रुपये दर मिळत आहे. बांगलादेशमध्ये जाणाऱ्या द्राक्षाला ब्रेक लागला आहे. तेथे सीमेवर सर्व्हर डाऊन असल्याने निर्यातीचा खोळंबा झाला आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल
कंटेनरच्या दरात ८० टक्के वाढ; अनुदानही थांबल्याने फटका 

कोरोनामुळे द्राक्षउत्पादक कर्जबाजारी झाले. यंदा निर्यातीतून गेल्या वेळची तूट भरून निघेल असे वाटत असताना कंटेनर दरवाढ व अनुदान थांबविल्याने निर्यातदार कंपन्याना होणारे नुकसान त्यांनी शेतकर्यांच्या माथी मारले आहे. दरवर्षी होणारी सुमारे साडेतीन हजार कंटेनरची निर्यात यंदा घसरणार आहे. त्यामुळे परकी चलन कमी उपलब्ध होईल. - कैलास भोसले, खजिनदार, द्राक्ष बागाईतदार संघ