पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : परदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने परदेशात लॉकडाउनची टांगतील तलवार, केंद्र शासनाने निर्यातीवरील अनुदान हटविताना केलेली कंटेनरची भाडेवाढ, अशा प्रतिकूल स्थितीने द्राक्षांच्या निर्यातीत मोठा अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम दरवर्षाच्या तुलनेत दहा टक्के निर्यातीत घट झाली आहे. गतवर्षी ९२ हजार मेट्रिक टन द्राक्ष आतापर्यंत सातासमुद्रापार पोचले होते. यंदा ८१ हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक द्राक्ष परदेशात जाऊ शकले नाहीत. द्राक्षनिर्यातीतून दरवर्षी मिळणारे १५ हजार कोटींचे परकी चलन यंदा १२ हजार कोटीपर्यंत मिळू शकते. निर्यातीचा अपेक्षित गोडवा यंदा द्राक्ष उत्पादकांना चाखता येणार नाही.
देशात द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र अव्वल आहे. त्यात ९१ टक्के म्हणजे ६० हजार हेक्टरवर द्राक्षबागा नाशिकमध्ये पसरल्या आहेत. यूरोप, इंग्लंड, रशियासह जगभरातील देशात नाशिकच्या द्राक्षांच्या मधाळ द्राक्षांची भुरळ पडते. जानेवारीपासून नाशिकचे द्राक्ष परदेश वारीला सज्ज होतात. गोडी, आकार अशा गुणवत्तेच्या बळावर महाराष्ट्रातील द्राक्षउत्पादकांनी परदेशी बाजारपेठेत छाप सोडली आहे.
हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ
निर्यातीला शुक्लकाष्ट
द्राक्षनिर्यात यंदा प्रारंभीपासूनच शुक्लकाष्ट लागलेले दिसते. केंद्र शासनाने कंटेनरच्या अनुदानावर फुली मारली. कंटेनरची भाडेवाढ झाल्याने दुसरा झटका बसला. पाठोपाठ अवकाळी पाऊस, गारपिटीने द्राक्षांचा दर्जा घसरला. त्यात युरोप, जर्मनी, फ्रान्स येथे काही प्रमाणात लॉकडाउन आहे. हे संकट अद्यापपर्यंत कायम आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांना निर्यातदारांकडून कधी नव्हे तो ६० रुपये दर मिळाला. परदेशात चिलीच्या द्राक्षांशी स्पर्धा करताना यंदा भारतीय द्राक्षांची दमछाक झाली आहे. निर्यातीचे दर रोडावल्याने त्याचा दबाव स्थानिक द्राक्षांच्या बाजाराभावावर दिसला.
११ हजार मेट्रिक टनाची घट
२३ मार्च २०२० ला ६ हजार ८४२ कंटेनरमधून ९२ हजार ३४२ मेट्रिक टन द्राक्ष परदेशात बाजारपेठेत पोचली. यंदा संकटाची मालिका द्राक्षनिर्यातीला खोडा घालत आहे. आतापर्यंत सहा हजार ६७ कंटेनरमधून ८१ हजार ६२ मेट्रिक टन द्राक्षांनी परदेशवारी केली. १० टक्के निर्यात घसरणीमुळे ३ हजार कोटींचे परकी चलन भारतात येऊ शकणार नाही. नेंदरलँड ५३ हजार १६५ मेट्रिक टन, युनाटेड किंगडम १३ हजार ८३५ मेट्रिक टन, जर्मनी ७ हजार ६०७ मेट्रिक टन, डेनमार्क, स्पेन, पोलंड, स्वित्झर्लंड, स्विडन, बेल्झिअम, इटली, फ्रान्स या देशात यंदा भारतातील द्राक्ष पोचली. अजून १५ एप्रिलपर्यंत निर्यातीचा हंगाम सुरू राहील. सुमारे एक हजार कंटेनरमधून १३ हजार टन द्राक्ष पोचू शकतात. त्यामुळे दरवर्षी होणारी सुमारे साडेआठ ते नऊ हजार कंटेनर द्राक्षनिर्यात यंदा होण्याची खात्री नाही.
हेही वाचा - स्वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी
अवकाळीमुळे एकत्र छाटणी होऊन एकाच वेळी द्राक्षांचे बंपर पीक बाजारात आले. पण लॉकडाउनमुळे परदेशात मागणी नव्हती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतील निच्चांकी दर मिळतो आहे. प्रारंभी दक्षिण अफ्रिका व आता चिली, पेरू येथील द्राक्ष युरोप, रशियाच्या बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना जोरदार टक्कर देत आहेत. निर्यातीचा टक्का घसरल्याने हंगामाच्या अखेरीस एकूण तीन हजार कोटींचा फटका बसू शकतो.
- लक्ष्मण सावळकर, मॅग्नस ग्रेप्स एक्सपोर्ट.