नाशिक : ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने द्राक्षपंढरीला हजार कोटींचा दणका दिला. रशियासह दुबईला पाठवण्यासाठी द्राक्षांचे ‘पॅकिंग’ सुरू झालेल्या कसमादे पट्ट्यातील घडांचे मणी तडकले आहेत. त्याचवेळी नाशिक-नगरच्या पट्ट्यात वजनाबरोबर चांगले पैसे मिळतील, या उद्देशाने २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत छाटलेल्या बागा फुलोऱ्यात असून, अशा २० हजार एकरावरील बागांमध्ये कूज आणि गळ व्हायला लागलीय.
‘अर्ली’ द्राक्ष हंगामासाठी परिचित असलेल्या कमसादे पट्ट्यात डावणी रोगाची ओळख नसलेल्या द्राक्षबागांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी घड जिरणे, कूज, डावणी, करप्याचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने जवळपास २५ टक्के बागा शेतकऱ्यांनी तोडल्या आहेत. मुळताच, परतीचा मॉन्सून हजेरी लावत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी अर्ली हंगामासाठी छाटण्यांचे वेळापत्रक तयार केले होते. आर्द्रता वाढत नसल्याने कीडरोगाचा प्रादुर्भाव या शेतकऱ्यांना फारसा माहिती नव्हता. पण, निसर्गचक्र बदलल्याने द्राक्षबागा तोडलेले शेतकरी डाळिंब, भाजीपाल्याकडे वळाले आहेत. गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे लक्ष दिले. त्यामुळे कसमादे पट्ट्यात आता अर्ली हंगामासाठी सात हजार एकर क्षेत्र उरले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या दोन हजार एकरावरील अर्ली द्राक्षे निर्यातीसाठी तयार झाली होती. नेमक्या अशा द्राक्षबागांमधील मणी तडकले आहेत. सोमवारची (ता.१४) हवामानाची परिस्थिती विचित्र राहणार असल्याने आणखी किती नुकसान होणार, या चिंतेत द्राक्ष उत्पादक आहेत.
हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ
एकचतुर्थांश उत्पन्न
पिंगळवाडे (ता. बागलाण) येथील केदा बापू भामरे यांची द्राक्षांची ८० एकर बाग आहे. नैसर्गिक आपत्तीला कंटाळून २० ते ४२ एकरापर्यंतप्रमाणे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडल्या असल्या, तरीही श्री. भामरे यांनी यंदा उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना एकरी अडीच ते तीन लाखांचा खर्च आला. त्यांची द्राक्षे रशिया आणि दुबईला पाठवण्याच्या स्थितीत पोचली असताना ढगाळ हवामान आणि पावसाने मणी तडकले आहेत. त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना एकचतुर्थांश उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
भुरीचा प्रादुर्भाव वाढला
ढगाळ हवामान राहिले आणि आर्द्रता ८० टक्क्यांच्या आत असल्यास ऑक्टोबरमध्ये छाटलेल्या बागांमधील द्राक्षांच्या मण्यांचा आकार वाढतो. पण, आता मण्यांमध्ये पावसाचे पाणी फिरल्याने, पंधरा ते सोळा टक्के साखर असताना, काढणी सुरू असलेल्या अशा तिन्ही टप्प्यांत मणी तडकले आहेत. बारामती परिसरात काही ठिकाणी द्राक्षांची काढणी सुरू असली, तरीही तिथं पाऊस नाही. मात्र नाशिक आणि नगर जिल्ह्यांत ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत छाटलेल्या बागांमध्ये गळ, कूज डोळ्याला दिसू लागली आहे. भुरीचा प्रादुर्भाव वाढला आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी एकावेळी हजार रुपयांचा फवारणीचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे अशा २० हजार एकरातील बागांमधून एकरी पाच टन उत्पादन घटण्याची स्थिती तयार झाली आहे. बाजारात मिळणारा भाव लक्षात घेतल्यावर हे नुकसान किती मोठे आहे, याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही.