द्राक्षपंढरीत लालबाग खातोय ‘भाव’; प्रतिकिलो ३०० रुपये दराने होतेय विक्री

निफाड (नाशिक) : द्राक्षपंढरी अशी ओळख असणाऱ्या निफाडमध्ये दर वर्षी डिसेंबरमध्येच द्राक्ष बाजारात दाखल होत असतात. परंतु, बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने अजूनही निफाडच्या बाजारात द्राक्ष दाखल झालेले नाहीत. त्यातच द्राक्षाआधी आंबे बाजारात दाखल झाले असून, लालबाग जातीच्या आंब्याला तीनशे रुपये किलो दर मिळत आहे. नागरिकांनी आंबे खरेदी करण्यास प्रतिसाद दिला आहे. 

निफाडच्या बाजारात ३०० रुपये किलो दर 

निफाडचे द्राक्ष आपल्या अवीट गोडीमुळे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपासून निसर्गाच्या फेऱ्यात द्राक्षबागा अडकलेल्या आहेत. कधी जास्त पाऊस, कधी धुके, कधी गारपीट, तर कधी अवकाळी या विपरीत परिस्थितीतही इथला शेतकरी दर्जेदार उत्पादन घेतो. चार महिन्यांपासून पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे द्राक्ष हंगामाची सुरवात उशिरा झाली आणि पर्यायाने द्राक्ष काढणीदेखील उशिरा होत आहे. त्यातच पुन्हा एकदा दोन-तीन दिवसांपासून अवकाळीने द्राक्ष काढणीला विलंब होणार आहे. या सर्व परिस्थितीशी दोन हात करीत असताना डिसेंबरमध्ये येणारे द्राक्ष अजूनही बाजारात दाखल झालेले नाहीत. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

व्यावसायिकांना द्राक्षाची प्रतीक्षा 

त्यातच जे आंबे फेब्रुवारीत येत होते, ते महिनाभर आधीच बाजारात दाखल झाल्याने आता द्राक्षांना आंब्याबरोबरच स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे द्राक्षाच्या भावावरही परिणाम होणार आहे. दरम्यान, निफाड, पिंपळगाव, नाशिक, सिन्नर, येवला, चांदवड महामार्गावरील सर्व गावांच्या ठिकाणी दोन हजारांहून अधिक कुटुंब स्टॉलच्या माध्यमातून द्राक्षविक्री करतात. मात्र, अजूनही द्राक्ष बाजारात दाखल झाले नसल्याने या व्यावसायिकांना द्राक्षाची प्रतीक्षा आहे. 

हेही वाचा >  संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

आधी कोरोना आणि नंतर चार महिने कोसळलेला पाऊस यामुळे द्राक्षांचा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यामुळे यंदा द्राक्ष उशिराने बाजारात येणार आहेत. त्यातच निफाडची द्राक्षपंढरी अवकाळीच्या फेऱ्यात सापडली असून, ही परिस्थिती निवळण्याची प्रतीक्षा आम्हाला आहे. - छोटूकाका पानगव्हाणे, अध्यक्ष, द्राक्षसंघर्ष समिती