द्राक्षपंढरीला गारपिटीने झोडपले! यंदा आस्मानी-सुलतानी संकटांनी द्राक्षउत्पादक बेजार

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : दराअभावी द्राक्ष हंगाम अगोदरच अडचणीत असताना शनिवारी (ता. २०) दुपारी आभाळ फाटले. अवकाळीसह टपोऱ्या गारांनी द्राक्षपंढरी अक्षरशः हादरली. काढणी सुरू असलेल्या द्राक्षघडाच्या मण्यांवर गारांनी जोरदार तडाखा दिला. निर्यातक्षम द्राक्षांना गारपिटीने तडे गेले असून, ते बेदाण्याच्या दरात विकावे लागतील. पंधरा मिनिटांच्या तुफान वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शिल्लक द्राक्षबागा बाधित झाल्या. आस्मानी-सुलतानी संकटांनी द्राक्षउत्पादक यंदा बेजार झाला आहे. 

सध्या निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये काढणीची लगबग सुरू आहे. २५ ते ३० रुपये प्रतिकिलो अशा अत्यल्प दरात का होईना शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांसोहत सौदे केले आहेत. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जना होऊ लागल्या अन् शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. जोरदार वादळी वाऱ्यासह गारा व अवकाळी पावसाने पिंपळगावमध्ये दाणादाण उडवून दिली. उंबरखेड, साकोरे मिग अशा पश्‍चिम भागातील काही ठिकाणी गारांचा कहर झाला. काढणी सुरू असलेल्या द्राक्षबागांमध्ये एकच धांदल उडाली. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

अद्याप निफाड तालुक्यात ४० टक्के म्हणजे २५ हजार एकरावरील द्राक्ष शिल्लक आहेत. कुणाची काढणी सुरू होती, तर कुठे सौदे झाले होते. आजच्या १५ मिनिटांच्या गारांनी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. देश-परदेशात जाणाऱ्या द्राक्षांना तडे गेल्याने ते बेदाण्यासाठी मातीमोल विकावे लागणार आहेत. द्राक्षघडांना गेलेले तडे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, रब्बी हंगामातील काढणीला आलेले गव्हाचे पीकही पावसात भिजले. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती